दुसरा सराव सामना अनिर्णीत
* हिकेन शाहचे शतक हुकले *  निक कॉम्प्टनचे नाबाद अर्धशतक  * मुंबई ‘अ’ सर्वबाद २८६; इंग्लंड २ बाद १४९
सराव सामन्यातून जे साध्य करायचे होते, ते आम्ही केले आहे, ही इंग्लंडचा सलामीवीर निक कॉम्प्टनची प्रतिक्रिया डी. वाय. पाटील स्टेडियमवर सुरू असलेल्या दुसऱ्या सराव सामन्याचे सार सांगणारी होती. सामन्याच्या तिसऱ्या दिवशीही इंग्लंडबरोबरच मुंबई ‘अ’ संघाने ईर्षेने क्रिकेट खेळण्यापेक्षा सराव करण्यावरच अधिक भर दिला. मुंबईच्या पहिल्या डावात हिकेन शाहचे शतक ८ धावांनी हुकले, तो बाद झाल्यावर मुंबई ‘अ’ संघाचा डाव ४६ धावांत सर्वबाद झाला, त्यांना पहिल्या डावात २८६ धावा करता आल्या. प्रत्युत्तरादाखल फलंदाजीला आलेल्या इंग्लंडच्या सलामीवीरांनी खेळपट्टीवर नांगर टाकण्यावर भर दिला. भारतीय दौऱ्यात ‘फ्लॉप’ ठरत चाललेल्या आणि क्रिकेटची परंपरा लाभलेल्या निक कॉम्प्टनच्या अर्धशतकाच्या जोरावर तिसऱ्या आणि अंतिम दिवसाचा खेळ थांबवण्यात आला तेव्हा इंग्लंडने २ बाद १४९ अशी मजल मारली होती.
हिकेन शाह या सामन्यातले पहिले शतक झळकावेल असे वाटत होते, दोन चौकार लगावत त्याने चांगली सुरुवातही केली. पण नव्वदीची वेस ओलांडल्यावर दोन धावा काढत तो तंबूत परतला. १९४ चेंडूंत ११ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर हिकेनने ९२ धावांची खेळी साकारली. हिकेन बाद झाल्यावर मुंबई ‘अ’ संघाच्या फलंदाजांना जास्त काळ खेळपट्टीवर पाय रोवणे जमले नाही आणि संघाचा डाव २८६ धावांत संपुष्टात आला. समित पटेल आणि माँटी पनेसार या फिरकीपटूंनी प्रत्येकी तीन बळी मिळवले.
सावध सुरुवात करत इंग्लंडने उपाहारापर्यंत एकही बळी गमावला नाही. पण उपाहारानंतर मात्र शार्दूल ठाकूरने जो रूटला (२४) पायचीत पकडत संघाला पहिले यश मिळवून दिले. महान क्रिकेटपटू डेनिस कॉम्प्टन यांचा वारसा पुढे चालवणाऱ्या निकला भारतीय दौऱ्यात आतापर्यंत लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. पहिल्या सराव सामन्यात ० आणि या सामन्याच्या पहिल्या डावात अवघी १ धाव काढणाऱ्या निकने या संधीचा चांगलाच फायदा उचलला. खेळपट्टीवर नांगर टाकायचा आणि जास्तीतजास्त चेंडू खेळायचे ही त्याची रणनीती दुसऱ्या डावात मात्र चांगलीच यशस्वी ठरली. धावा करण्यासाठी कोणतीही जोखीम न उचलता त्याने कासवगतीने धावा केल्या आणि भारताविरुद्धच्या सराव सामन्यापूर्वी फॉर्ममध्ये येण्याचा त्याचा हा प्रयत्न सफल झाला. तब्बल १६२ चेंडूंचा सामना करीत सहा चौकारांनिशी त्याने नाबाद ६४ धावांची खेळी साकारली आणि हा सराव सामना सार्थकी लावला. जोनाथन ट्रॉटला (३०) या सामन्यात सूर गवसला नाही, तर इयान बेलने (नाबाद २८) शांतपणे गोलंदाजांचा सामना करत दिवस खेळून काढण्यावर भर दिला. * मुंबई ‘अ’-इंग्लंड दुसरा सराव सामना अनिर्णीत

रणनीतीत यशस्वी ठरलो – कॉम्प्टन

भारताच्या दौऱ्यावर आल्यावर माझ्याकडून चांगली कामगिरी होत नव्हती. त्यामुळे या सामन्यासाठी जास्तीत जास्त खेळपट्टीवर राहायचे आणि जास्तीत जास्त चेंडू खेळायचे, हीच रणनीती मी आखली होती. या रणनीतीत मी यशस्वी ठरलो असून भारताविरुद्धच्या सामन्यासाठी मला या नाबाद अर्धशतकी खेळीचा नक्कीच फायदा होईल. सराव सामन्यांचा आम्हाला चांगलाच फायदा होत आहे. फलंदाज आणि गोलंदाजांना चांगला सराव मिळाला असे इंग्लंडचा सलामीवीर निक कॉम्प्टनने सांगितले.    
गुजराती ‘केमिस्ट्री’ चांगली जुळली -शाह
मी आणि चेतेश्वर पुजारा दोघेही गुजराती असल्याने खेळपट्टीवर याचा आम्हाला फायदा झाला, आमची ‘केमिस्ट्री’ चांगलीच जुळली. या सामन्यात चांगल्या धावा झाल्याने मी आनंदी आहे, धावा करण्याचे माझे काम मी केले आहे. त्यामुळे निवड समितीने संधी दिल्यास मी नक्कीच चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेन, असे हिकेन शाहने सांगितले.