वय फक्त १५ आणि वरिष्ठ गटाची आंतरराष्ट्रीय स्तरावरची पहिलीच स्पर्धा. मात्र या नवखेपणाचे कोणतेही दडपण जाणवू न देता टाटा खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आंध्रप्रदेशच्या जी. रुथविका शिवानीने दुसऱ्या मानांकित नेहा पंडितला पराभवाचा धक्का दिला. हा विजय चमत्कार नाही कारण कनिष्ठ गटाच्या अनेक जेतेपदांवर कब्जा केल्यानंतर रुथविकाने वरिष्ठ गटाचे पदार्पणही दिमाखात केले.
वरिष्ठ गटात खेळणे हे माझ्यासाठी आव्हानात्मक आहे. क्रमवारीतील स्थानापेक्षा सर्वोत्तम कामगिरी कशी होईल यावर भर असेल. आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्यपदकाने आपणही अव्वल दर्जाचे बॅडमिंटन खेळू शकतो हा विश्वास मिळाल्याचे रुथविकाने सांगितले. यावर्षी इंफाळ येथे झालेल्या कनिष्ठ गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेत रुथविकाने १९ तसेच १७ वर्षांखालील गटाचे जेतेपद पटकावले.
रुथविका हैदराबादपासून चार तासांवर असलेल्या खम्ममची. वडिलांच्या प्रेरणेमुळे सहाव्या वर्षीच तिने बॅडमिंटनची रॅकेट हाती घेतली. प्रशिक्षक सुधाकर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली तिने बॅडमिंटनची मुळाक्षरे गिरवायला सुरुवात केली. यादरम्यानच जिल्हा, राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये तिने आपली मोहोर उमटवली. वर्षभरापासून रुथविका गोपीचंद अकादमीत प्रशिक्षण घेत आहे. माझा खेळ, त्यातील त्रुटी समजून घेऊन त्यानुसार वेळापत्रक ठरवले जाते. मानसिक कणखरतेसाठी गोपीचंद सर योगा आणि ध्यान यांची मदत घेतात. घरच्यांच्या पाठिंब्यामुळेच बॅडमिंटनसाठी वेळ देता आला असे ती सांगते. बॅडमिंटनमुळे दहावीच्या वर्षांत अवघा महिनाभर अभ्यास करता आला असली तरी रुथविकाने ८८ % गुण मिळवले होते.
क्रमवारीपेक्षा सर्वोत्तम कामगिरीसाठी प्रयत्नशील -रुथविका
वय फक्त १५ आणि वरिष्ठ गटाची आंतरराष्ट्रीय स्तरावरची पहिलीच स्पर्धा. मात्र या नवखेपणाचे कोणतेही दडपण जाणवू न देता टाटा खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आंध्रप्रदेशच्या जी. रुथविका शिवानीने दुसऱ्या मानांकित नेहा पंडितला पराभवाचा धक्का दिला.
First published on: 15-12-2012 at 02:05 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Concentrating on good performance not on rating