नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीगिरांना मिळालेल्या वागणूकीचा निषेध करत जागतिक कुस्ती संघटनेने मंगळवारी भारतीय कुस्ती महासंघ निलंबित करण्याचा इशाराही दिला.ब्रिजभूषण यांच्याविरोधात उभे राहिलेल्या भारतीय कुस्तीगिरांचे आंदोलन रोखताना कुस्तिगीरांना दिलेल्या वागणूकीचा निषेध करणारे ‘ट्वीट’ जागतिक कुस्ती महासंघाने केले. भारतीय कुस्ती क्षेत्रात सध्या जे काही सुरु आहे त्याकडे जागतिक संघटना कायम नजर ठेवून होती. आंदोलक कुस्तीगिरांची ज्या पद्धतीने धरपकड करण्यात आली ती कृती निषेधार्हच आहे. आमच्या जागतिक संघटनेच्या प्रशासकीय यंत्रणेने याची दखल घेतली आहे.
भारतीय कुस्ती महासंघाला नव्या निवडणूकीची कार्यपद्धती तातडीने राबविण्याची सूचना केली आहे. याबाबतची माहिती त्वरित न दिल्यास भारतीय कुस्ती महासंघ निलंबित करण्याचा इशाराही जागतिक संघटनेने दिला आहे. विशेष म्हणजे कुस्तीगिरांच्या सुरुवातीच्या निषेधानंतर क्रीडा मंत्रालयाने महासंघाची निवडणूक प्रक्रिया स्थगित करून ती नव्याने राबविण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन केली होती. या समितीला यासाठी ४५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
आंदोलन जबरदस्तीने संपुष्टात आणल्यानंतर विनेश फोगट, बजरंग पुनिया, साक्षी मलिक या मल्लांनी आपली आंतरराष्ट्रीय पदके गंगा नदीत विसर्जित करण्याचा इशारा दिला. यानंतर तातडीने जागतिक कुस्ती महासंघाने या संदर्भातील आपले हे निवेदन सादर केले आहे. जागतिक संघटनेने महासंघाच्या निवडणुकीसंदर्भातील क्रीडा मंत्रालयाच्या हस्तक्षेपाचे स्वागत करून दिलेल्या ४५ दिवसांच्या मुदतीचा आदर केला. मात्र, ही मुदत देखील टळल्यास भारतीय कुस्ती महासंघाचा निलंबित केले जाईल, असा इशारा देताना जागतिक कुस्ती महासंघाने मार्च महिन्यात भारताकडून आशियाई कुस्ती स्पर्धेचे आयोजन काढून घेण्यात आलेल्या कारवाईची आठवण करून दिली.
भारतीय कुस्तीपटूंना २८ मे रोजी मिळालेली वागणूक वाईट होती. जे घडले ते पाहून निराश झालो. योग्य संवादाने गोष्टी सोडवता येतात. यावर लवकरात लवकर तोडगा निघावा ही अपेक्षा. – अनिल कुंबळे, माजी क्रिकेटपटू
कुस्तीपटूंना मिळालेल्या वागणूकीने दु:खी झालो. चांगल्या पद्धतीने या संघर्षांला सामोरे जाता आले असते. – नीरज चोप्रा, भालाफेकपटू