आयपीएलमधील स्पॉट-फिक्सिंग आणि सट्टेबाजीप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेले बीसीसीआयचे पायउतार झालेले अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कार्याध्यक्षपदी औपचारिक निवड झाली. मेलबर्न येथे झालेल्या आयसीसीच्या वार्षिक बैठकीत श्रीनिवासन यांच्या निवडीवर ५२ सदस्यीय कार्यकारी परिषदेने श्रीनिवासन यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब केले. संलग्न सदस्य राष्ट्रांच्या आर्थिक वितरण प्रकरणी आयसीसीच्या प्रशासकीय फेररचनेनंतरचे श्रीनिवासन हे पहिले कार्याध्यक्ष आहेत. यावेळी मुस्तफा कमाल यांची आयसीसीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली.
आयपीएल स्पर्धेतील मॅच-फिक्सिंग प्रकरणी आरोपांच्या गर्तेत अडकल्याने श्रीनिवासन यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून दूर व्हावे असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. भारतातील क्रिकेट नियंत्रित करणाऱ्या संघटनेच्या अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागलेल्या श्रीनिवासन यांना आयसीसीच्या कार्याध्यक्षपदाची सूत्रे मिळणार का? याविषयी उलटसुलट चर्चाना उधाण आले होते. मात्र तरीही बीसीसीआयतर्फे श्रीनिवासन यांच्याच नावाची शिफारस करण्यात आली होती. ही शिफारस रोखायला सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला होता. यामुळे श्रीनिवासन यांचा आयसीसीचे कार्याध्यक्ष होण्याचा मार्ग सुकर झाला. आयसीसीच्या नव्या संरचनेनुसार भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड क्रिकेट मंडळांना आयसीसीच्या कारभारात महत्त्वाचे स्थान असणार आहे.
‘‘आयसीसीचे कार्याध्यक्षपद हा माझ्यासाठी बहुमान आहे. क्रिकेटला मैदानावर आणि मैदानाबाहेर बळकट करण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन,’’ असे श्रीनिवासन यांनी सांगितले.
८ फेब्रुवारीला सिंगापूर येथे झालेल्या बैठकीत आयसीसीच्या नियमांमध्ये बदल करण्याचा मुद्दा मांडण्यात आला. १० एप्रिलला झालेल्या बैठकीत या बदलाला मंजुरी देण्यात आली. २०१६पासून आयसीसी कार्यकारी मंडळाला निर्णय घेण्याचे अधिकार असतील. आयसीसी कार्यकारी मंडळ दोन वर्षांच्या कालावधीसाठी आयसीसीच्या अध्यक्षाची निवड करेल. मेलबर्न येथील बैठकीत अमेरिकेच्या क्रिकेट संघटनेला मान्यता देण्यात आली. तसेच ३८वे सहसदस्य राष्ट्र म्हणून ओमानला समाविष्ट करून घेण्यात आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा