कुस्ती हा भारतीय मातीमधील मुरलेला क्रीडा प्रकार मानला जात असला तरी आशियाई क्रीडा स्पर्धेत गेल्या २८ वर्षांमध्ये भारताला सुवर्णपदकाने हुलकावणी दिली होती. योगेश्वर दत्तने इन्चॉन येथे ६५ किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवीत ऐतिहासिक कामगिरी केली.
राष्ट्रकुल व आशियाई क्रीडा स्पर्धामध्ये भारताला नेहमीच मल्लांनी भरघोस पदके मिळवून दिली आहेत. मात्र आशियाई क्रीडा स्पर्धामध्ये अनेक वर्षे भारतीय मल्लांना अव्वल दर्जाची कामगिरी करता आली नव्हती. १९८६ मध्ये कर्तारसिंग यांनी भारताला आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून दिले होते. त्यानंतर सुवर्णपदक मिळविण्याची क्षमता असूनही भारतीय मल्लांना त्या यशापर्यंत पोहोचता आले नाही. त्यामुळेच योगेश्वरने मिळविलेल्या सुवर्णपदकाला अधिक तेजाची झळाळी आहे.
  योगेश्वर हा कठोर परिश्रम करणारा व जिद्दीने लढणारा खेळाडू आहे. २००६ मध्ये त्याने आशियाई स्पर्धेत कांस्यपदक मिळविले होते. या स्पर्धेसाठी दोहा येथे रवाना होण्यापूर्वी जेमतेम नऊ दिवस बाकी असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. तरीही मानसिक दडपण न घेता तो या स्पर्धेत सहभागी झाला होता. स्पर्धेच्या वेळी त्याला दुखापतही झाली होती. अशी अनेक दु:ख झेलत त्याने या स्पर्धेत पदकावर आपले नाव कोरले.
कारकिर्दीत योगेश्वरला अनेक वेळा दुखापतींनी ग्रासले आहे, पण असे असूनही त्याने या दुखापतींवर मात करीत पदकांची लयलूट केली आहे. २०१२मध्ये लंडन येथे झालेली ऑलिम्पिक स्पर्धा ही त्याच्यासाठी आणि पर्यायाने भारतासाठीही संस्मरणीय ठरली आहे. त्याने या स्पर्धेत कांस्यपदक मिळवीत भारताला एकाच वेळी ऑलिम्पिकसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत दुहेरी आनंद दिला होता. त्या वेळी त्याचा ज्येष्ठ सहकारी सुशीलकुमार याने कुस्तीत रौप्यपदक मिळविले. या स्पर्धेत योगेश्वर याने कांस्यपदकासाठी केलेली लढत अतिशय उत्कंठापूर्ण व लक्षवेधक होती. या लढतीपूर्वी योगेश्वरच्या उजव्या डोळ्यावरील भागाला मोठी दुखापत झाली होती. त्या डोळ्याने त्याला स्पष्ट दिसतही नव्हते. त्याच्या जागी दुसरा एखादा खेळाडू असता तर त्याने या लढतीमधून माघारही घेतली असती. मात्र ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. हातातोंडाशी आलेला पदकाचा घास सोडण्यासाठी योगेश्वरचे मन तयार नव्हते. आपल्या दुखापतीची काळजी न करता त्याने कांस्यपदकाची लढत मोठय़ा निर्धाराने खेळली आणि जिंकली.
या ऑलिम्पिक स्पर्धेनंतर जवळजवळ दोन वर्षे योगेश्वर व सुशीलकुमार यांनी दोन वर्षे स्पर्धात्मक कुस्तीत भाग घेतला नव्हता. त्यांनी जागतिक स्पर्धेवरही पाणी सोडले होते. त्या वेळी त्यांच्यावर खूप टीकाही झाली होती. मात्र राष्ट्रकुल व त्यापाठोपाठ होणाऱ्या आशियाई स्पर्धेत अव्वल कामगिरी करण्यासाठीच आपण विश्रांती घेत असल्याचे या दोन्ही खेळाडूंनी सांगितले होते. योगेश्वरने राष्ट्रकुलपाठोपाठ आशियाई स्पर्धेतही सोनेरी कामगिरी करीत आपला शब्द खरा ठरविला. त्याची ही दोन्ही सुवर्णपदके म्हणजे २०१६ मध्ये रिओ येथे होणाऱ्या ऑलिम्पिक पदकाची नांदीच आहे असे म्हटले पाहिजे.
सुशीलकुमारने या स्पर्धेत भाग घेतला नाही, अन्यथा आणखी एक सुवर्णपदक भारताला कुस्तीत मिळाले असते. त्याचा सहकारी बजरंग याला सुवर्णपदकाने हुलकावणी दिली. अंतिम लढतीत त्याला इराणच्या मासूद महंमद याच्याविरुद्ध १-३ असा पराभव पत्करावा लागला. सुवर्णपदकाची क्षमता असलेल्या नरसिंग यादवला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
योगेश्वरसारखे यश मिळविण्याची क्षमता महाराष्ट्राच्या अनेक मल्लांमध्ये आहे, मात्र महाराष्ट्र केसरी सन्मानापेक्षाही आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामधील त्यातही आशियाई व ऑलिम्पिकमधील पदक हे सर्वोच्च सन्मानाचे यश आहे असे मानून महाराष्ट्राच्या मल्लांनी व्यापक दृष्टिकोन ठेवीत आपली कारकीर्द समृद्ध करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तरच खाशाबा जाधव यांनी ऑलिम्पिकमध्ये मिळविलेल्या पदकाचा वारसा पुढे चालविण्यात महाराष्ट्राच्या मल्लांना यश मिळेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा