Shama Mohamed Post after India’s semi-final win: काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माबाबत वादग्रस्त विधान करून वाद ओढवून घेतला होता. रोहित शर्मा लठ्ठ असून तो कर्णधार म्हणूनही फारसा प्रभावी नाही, अशी पोस्ट शमा मोहम्मद यांनी एक्सवर केली होती. त्यानंतर भाजपासह क्रिकेट चाहत्यांनी त्यांच्यासर काँग्रेसलाही घेरले. राहुल गांधी कर्णधार असताना काँग्रेसचाही सातत्याने पराभव होत आहे, अशी खोचक टीका भाजपाकडून करण्यात आली. त्यानंतर आता भारतीय क्रिकेट संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये उपांत्यफेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर विजय मिळविल्यानंतर शमा मोहम्मद यांनी पुन्हा एकदा पोस्ट टाकली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी विराट कोहलीचा उल्लेख केला.
शमा मोहम्मद काय म्हणाल्या?
शमा मोहम्मद यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले, “भारतीय क्रिकेट संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियावर मिळवलेला विजय ऐतिहासिक असा आहे. त्याबद्दल भारतीय संघाचे अभिनंदन. विराट कोहलीने ८४ धावा केल्या आणि आयसीसीच्या स्पर्धेत १००० धावा करण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे. त्याचेही अभिनंदन!”
शमा मोहम्मद यांनी रोहित शर्माबाबत केलेल्या जुन्या पोस्टमध्येही विराट कोहलीचा उल्लेख केला होता. विराट कोहली फिटनेसला प्राधान्य देत असल्याचे सांगून त्यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या याआधीच्या कर्णधारांचा उल्लेख केला होता.
तसेच एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना शमा मोहम्मद यांनी रोहित शर्माचाही उल्लेख केलेला आहे. त्या म्हणाल्या, “भारतीय क्रिकेट संघाने कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली उपांत्य फेरीच्या सामन्यात विजय मिळविल्यामुळे मी खूप आनंदी आहे. तसेच विराट कोहलीने ८४ धावा केल्याबद्दल त्याचेही अभिनंदन करते. अंतिम फेरीच्या सामन्याची आता मला उत्सुकता लागली आहे.”
रोहित शर्माबाबत काय वाद झाला होता?
“रोहित शर्मा हा जागतिक दर्जाचा क्रिकेटपटू आहे”, अशी एक्स पोस्ट अब्दुल गफार नामक युजरने केली होती. या पोस्टला उत्तर देताना शमा मोहम्मद यांनी प्रश्न विचारला, “रोहित शर्मामध्ये जागतिक दर्जाचे असे काय आहे? त्याचे पूर्वसुरी सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, विराट कोहली, कपिल देव, रवि शास्त्री आणि इतरांकडे पाहा. त्यांच्या तुलनेत रोहित शर्मा एक साधारण कर्णधार आणि तितकाच सामान्य क्रिकेटपटू आहे. त्याला नशीबाने कर्णधार पदाची संधी मिळाली.

क्रिकेट चाहत्यांसह भाजपाने शमा मोहम्मद यांच्या विधानाचा निषेध केला होता. त्यांनी क्रिकेटपटूच्या शारीरिक व्यंगावर भाष्य केले असून टी-२० विश्वचषक जिंकून देणाऱ्या कर्णधाराचा अवमान केला आहे, अशी टीका भाजपाच्या प्रवक्त्यांनी केली.