विराट कोहलीने भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. यावर बहुतांश क्रिकेटपटू आणि क्रिकेट तज्ज्ञ आश्चर्य व्यक्त करत आहेत. भारताच्या मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार रोहित शर्माचेनेही याविषयी आश्चर्य व्यक्त केले आहे. विराट कोहलीच्या कसोटी कर्णधारपदावरून पायउतार होण्याच्या निर्णयाने रोहित शर्मालाही धक्का बसला आहे. मात्र निर्यणावरुन आता काँग्रेसने बीसीसीआयचे सचिव जय शहा यांच्यावरच निशाणा साधला आहे. क्रिकेट बोर्डातील ‘शाहजाद्यांचं’ राजकारण फार घाण पातळीवर उतरलंय अशा खोचक शब्दात काँग्रेस आमदाराने बीसीसीआयच्या कारभारावर टीका केली आहे.
राज्याचे उर्जा मंत्री आणि काँग्रेसचे आमदार नितीन राऊत यांनी विराट कोहलीच्या तडकाफडकी राजीनाम्यानंतर ही टीका केली आहे. “भारताच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार विराट कोहली जेव्हा राजीनामा देतो तेव्हा समजावं की क्रिकेट बोर्डातील “शाहजाद्यांचं” राजकारण फार घाण पातळीवर उतरलंय. मोहम्मद शमीच्या पाठीशी विराट पहाडासारखा उभा राहिला होता,” असे नितीन राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
विराट कोहलीनं भारताच्या कसोटी संघाचं कर्णधारपद सोडल्यानंतर रोहित शर्माची प्रतिक्रिया; म्हणाला….
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) एका दिवसानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचे अभिनंदन केले आहे. विराट कोहलीने कसोटी क्रिकेटच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर बीसीसीआयने अभिनंदन केले असून बोर्ड आणि निवड समिती त्यांच्या निर्णयाचा आदर करत असल्याचे म्हटले आहे. याशिवाय बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी विराट कोहलीबाबतही निवेदन दिले असून त्यात अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शाह, उपाध्यक्ष राजीव शुक्ला, कोषाध्यक्ष अरुण सिंग धुमाळ आणि संयुक्त सचिव यांच्या नावाचा समावेश आहे.
एका प्रसिद्धीपत्रकात, बीसीसीआयने म्हटले आहे की, बोर्डाला विश्वास आहे की ते भारतीय क्रिकेटला अधिक उंचीवर नेण्यासाठी विराट खेळाडू म्हणून आपले सर्वोत्तम कार्य करत राहतील. विराट कोहली हा भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार आहे. एमएस धोनीनंतर कर्णधारपदाची धुरा सांभाळणाऱ्या विराटने ६८ कसोटी सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले, त्यापैकी ४० सामने भारताने जिंकले. कर्णधार म्हणून भारताने २०१५ मध्ये श्रीलंकेत कसोटी मालिका जिंकली होती. २२ वर्षात प्रथमच भारताने हा पराक्रम केला. याशिवाय त्याच्या नेतृत्वाखाली भारताने २०१८-१९ मध्ये ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीवर पराभूत केले. त्याच वर्षी भारताने वेस्ट इंडिजविरुद्धची मालिकाही जिंकली होती. विराटने कसोटी संघाला पहिल्या क्रमांकावर नेले होते.