भारत आणि न्यूझीलंडमधील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातूनही यष्टीरक्षक संजू सॅमसनला वगळण्यात आलं आहे. संजू सॅमसन पुन्हा एकदा संघात स्थान मिळवण्यात अपयशी ठरला आहे. या मालिकेत संजू फक्त एकच सामना खेळू शकला असून, यामुळे क्रिकेट चाहते नाराजी व्यक्त करत आहेत. दरम्यान, आता यावर राजकीय क्षेत्रातही प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. केरळमधील काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी संजूला वगळल्याने भारतीय संघाच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
शशी थरुर यांनी बुधवारी सकाळी ट्वीट करत भारतीय संघाच्या धोरणावर प्रश्चिन्ह उपस्थित केलं आहे. शशी थरुर यांनी ट्वीटमध्ये व्हीव्हीएस लक्ष्मणच्या विधानाचा उल्लेख केला आहे, ज्यामध्ये त्याने ऋषभ पंतने चौथ्या क्रमांकावर चांगली कामगिरी केली असून अशा स्थितीत संघ त्याला पाठिंबा देईल असं म्हटलं होतं.
शशी थरुर काय म्हणाले आहेत?
“पंतने चौथ्या क्रमांकावर चांगली कामगिरी केली असून, त्याला पाठिंबा देणं गरजेचं आहे असं लक्ष्मणने म्हटलं आहे. तो चांगला खेळाडू आहे, पण सध्या फॉर्ममध्ये नाही. मागील ११ पैकी १० सामन्यांमध्ये तो अपयशी ठरला आहे. सॅमसनची एकदिवसीय सामन्यातील सरासरी ६६ इतकी आहे. गेल्या पाचही सामन्यात त्याने धावा केल्या असतानाही आता बाकावर बसला आहे. याबद्दल विचार करा,” असं शशी थरुर यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. ट्वीटमध्ये त्यांनी लक्ष्मण आणि संजूला टॅगही केलं आहे.
“पंतला आता विश्रांती देण्याची गरज आहे. संजूला आणखी एक संधी नाकारण्यात आली असून, आता त्याला आपण किती चांगले फलंदाज आहोत हे दाखवण्यासाठी आयपीएलची वाट पाहावी लागणार आहे,” अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
संजू सॅमसनने आत्तापर्यंत ११ एकदिवसीय सामने खेळले असून १० डावांमध्ये ६६ च्या सरासरीने ३३० धावा केल्या आहेत. एकदिवसीय आणि टी-२० मध्ये ऋषभ पंतच्या तुलनेत संजूची कामगिरी चांगली असल्याने त्याला वगळण्यात आल्याने चाहते नाराजी व्यक्त करत आहेत.
ऋषभ पंतने वन-डेमध्ये २९ सामने खेळले असून ३५.६२ च्या सरासरीने ८५५ धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे.