भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्या शारीरिक वजनावरून असभ्य टिप्पणी केल्याबद्दल काँग्रेसच्या प्रवक्त्या शमा मोहम्मद सोमवारी वादात सापडल्या. समाजमाध्यमावर केलेल्या शेरेबाजीमुळे शमा यांच्यावर जोरदार टीका होऊ लागल्यानंतर काँग्रेस पक्षाकडून त्यांना ताकीद देण्यात आली. त्यानंतर त्यांनी एक्सवरील आपली वादग्रस्त पोस्ट हटवली. दुसरीकडे केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडवीय यांनीही शमा मोहम्मद यांची पोस्ट अतिशय लज्जास्पद असल्याचे म्हणत टीका केली.
‘‘रोहित शर्मा हा खेळाडू म्हणून जाड आहे. त्याने वजन कमी करण्याची गरज आहे! तो आतापर्यंतचा सर्वात प्रभावहीन कर्णधार आहे!’’ असे मोहम्मद यांनी रविवारी रात्री ‘एक्स’वर लिहिले होते. मात्र, रोहित शर्मावरील टिप्पणी ही काँग्रेसची अधिकृत भूमिका नसल्याचा खुलासा पक्षाचे माध्यम व प्रसिद्धी विभागाचे प्रमुख पवन खेरा यांनी केला आणि भविष्यामध्ये खबरदारी घेतली जावी असा इशारा शमा मोहम्मद यांना दिला. दुसरीकडे, भाजपने त्यांच्यावर आणि काँग्रेस पक्षावर टीका केली. महत्त्वाच्या वेळी संघाचे मनोधैर्य खच्ची करण्यासाठी नियोजनपूर्वक ही टिप्पणी करण्यात आली असल्याचा आरोप भाजपचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी केला.