चढाया-पकडींचे तुंबळ युद्ध, विविध वाद्यं आणि डीजेच्या तालावरचा कबड्डीरसिकांचा उत्साही पाठिंबा यामुळे प्रो-कबड्डी लीगचा दुसरा दिवससुद्धा रंगतदार ठरला. यजमान यु मुंबा आणि बंगळुरू बुल्स या दोन संघांनी सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. शब्बीर बापूच्या प्रेक्षणीय खेळाच्या बळावर यु मुंबा संघाने बंगाल वॉरियर्सला ३६-२५ असे हरवले, तर अजय ठाकूरच्या शानदार खेळाच्या बळावर बंगळुरूने पुणेरी पलटणला ४०-३७ अशा फरकाने हरवले.
बंगळुरू आणि पुणे यांच्यातील पहिली लढत प्रामुख्याने अजय ठाकूर आणि वझिर सिंग यांच्यातील चढायांमुळे रंगली. सामन्याच्या पहिल्याच चढाईत ठाकूरची पकड झाली, तर दुसऱ्या चढाईत वझिरची पकड झाली. मग ११व्या मिनिटाला बंगळुरूने पुण्यावर लोण चढवला, तर १४व्या मिनिटाला पुण्याने त्याची परतफेड केली. मध्यंतराला २३-२१ अशी पुणेरी पलटणकडे आघाडी होती. उत्तरार्धात बंगळुरूने आणखी एक लोण चढवून अवघ्या तीन गुणांनी सामना खिशात घातला.
अजय ठाकूरने सलग दुसऱ्या दिवशी सामनावीर पुरस्काराला गवसणी घालताना २० चढायांमध्ये १५ गुणांची (१२ चढायांचे आणि ३ बोनस) कमाई केली. याबद्दल तो म्हणाला, ‘‘पहिल्याच चढाईत पकड झाली, परंतु मी दडपण घेतले नाही. संघाला जिंकून देण्यासाठी मी उत्साहाने चढाया केल्या. मेहनत आणि तंदुरुस्तीमुळेच अपेक्षित खेळाचे प्रदर्शन करता आले.’’ बंगळुरूकडून मनजित चिल्लरने सुरेख चढाया करीत ठाकूरला साथ दिली, तर धर्मराज छेरलाथनने प्रेक्षणीय पकडी केल्या. पुण्याकडून वझिर सिंगने चढायांचे ११ गुण मिळवले.
यु मुंबा आणि बंगाल वॉरियर्स यांच्यातील लढत मध्यंतरापर्यंत अटीतटीची झाली. मुंबा संघाने १४-१३ अशी जेमतेम एका गुणाची आघाडी घेतली होती. परंतु दुसऱ्या सत्रात शब्बीर बापू शर्फुद्दीनने दुसऱ्या सत्रात आपल्या चढायांचा धडाका कायम राखल्याने मुंबाने बंगालवर लोण चढवला. अनुप कुमार आणि रिशांक देवाडिगा यांनी त्याला चढायांमध्ये छान साथ दिली. शब्बीरने १८ चढायांमध्ये १२ गुण प्राप्त करत सामनावीर पुरस्कार पटकावला. पराभूत संघाकडून नितीन मदने छान
खेळला.
शनिवारच्या या सामन्यामध्ये अनुपकुमार चमकला रविवारच्या सामन्यात तू चमकलास, तुम्ही काही विशिष्ठ रणनीती आखली होती का, याबद्दल शब्बीर म्हणाला की, याबद्दल कोणतीच खास रणनीती आखली नव्हती. पण प्रत्येक खेळाडूचा दिवस असतो. शनिवारी अनुप चमकला आणि रविवारी माझ्याकडून चांगली कामगिरी झाली. अजून स्पर्धेतील बरेच सामने बाकी असून कामगिरीमध्ये सातत्य राखण्याकडे आमचा कल असेल.
एनएससीआयवरून..
थायलंडला चिंता आशियाई पदकाची
सप्टेंबर महिन्यात कोरियात होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पध्रेत पदक मिळवण्याचे उद्दिष्ट थायलंड संघाने बाळगले आहे. त्यामुळेच भारतात चालू असलेल्या प्रो-कबड्डी स्पध्रेत खेळण्याचे थायलंड संघाने टाळले. ‘‘दुखापती टाळण्यासाठीच आम्ही फक्त आमच्या सरावाकडे लक्ष केंद्रित केले आहे,’’ असे थायलंड संघाचे प्रशिक्षक रमेश भेंडिगिरी यांनी सांगितले. थायलंडचे दोन्ही संघ आशियाई स्पध्रेच्या तयारीच्या दृष्टीने महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले असून सध्या रायगड जिल्ह्यात सराव करीत आहेत. परंतु प्रो-कबड्डीच्या सामन्यांचा आस्वाद घेण्यासाठी संघातील महत्त्वाच्या चार खेळाडूंसह भेंडिगिरी यांनी एनएससीआयवर आवर्जून उपस्थिती राखली होती. २०१०मध्ये गुवांगझाऊ येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पध्रेतील महिला विभागात थायलंडने रौप्यपदकाची कमाई केली होती. महिलांच्या पहिल्यावहिल्या विश्वचषक कबड्डी स्पध्रेत भेंडिगिरी यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने जेतेपद मिळवले होते.
संघमालकांचासुद्धा एखादा सामना व्हावा -अभिषेक
जयपूर पिंक पँथर्स संघाचा मालक सिनेअभिनेता अभिषेक बच्चनने प्रो-कबड्डीच्या दुसऱ्या दिवशीही आवर्जून हजेरी लावली. सर्व संघमालकांचा एखादा प्रदर्शनीय कबड्डी सामना व्हावा, अशी इच्छा या वेळी त्याने प्रदर्शित केली. याशिवाय महिंद्रा उद्योगसमूहाचे प्रमुख आनंद महिंद्रा, आशियाई हौशी कबड्डी महासंघाचे अध्यक्ष जनार्दनसिंग गेहलोत आदी मान्यवर उपस्थित होते.
– प्रशांत मुंबईकर
वीर शब्बीर!
चढाया-पकडींचे तुंबळ युद्ध, विविध वाद्यं आणि डीजेच्या तालावरचा कबड्डीरसिकांचा उत्साही पाठिंबा यामुळे प्रो-कबड्डी लीगचा दुसरा दिवससुद्धा रंगतदार ठरला.
First published on: 28-07-2014 at 02:07 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Consequent victory of yuva mumbai bangalore bulls