शिवा थापा,आंतरराष्ट्रीय बॉक्सिंगपटू
रिओ ऑलिम्पिकमध्ये प्रवेश करण्याची एक संधी हुकली असली तरी खचलेलो नाही. अजून अनेक पात्रताफेऱ्या आहेत. सातत्यपूर्ण कामगिरी हेच यशाचे सूत्र मी पुढील वाटचालीत कायम राखण्याचा प्रयत्न करीन, असे मत भारताचा बॉिक्सगपटू शिवा थापाने खास मुलाखतीमध्ये व्यक्त केले. आंतरराष्ट्रीय बॉिक्सग संघटनेने जाहीर केलेल्या क्रमवारीत शिवाने ५६ किलो वजनी गटात दुसरे स्थान पटकावले. भारतीय बॉिक्सगपटूंत तो अव्वल स्थानावर आहे. त्यामुळे त्याच्याकडून रिओ ऑलिम्पिकमध्ये पदकाच्या आशाही उंचावल्या आहेत. यानिमित्ताने त्याच्याशी केलेली बातचीत..
नुकत्याच पार पडलेल्या जागतिक अजिंक्यपद स्पध्रेतील यशाबाबत काय सांगशील?
या स्पध्रेतील यश हे माझ्या आतापर्यंतच्या कारकीर्दीतील मोठे यश आहे. त्यामुळे हा आनंद शब्दात सांगणे कठीण आहे. या पदकाने मला पुढील वाटचालीसाठी प्रेरणा मिळाली आहे.

जागतिक क्रमवारीत तू तुझ्या गटात दुसऱ्या स्थानावर आहेस आणि भारतीयांमध्ये अव्वल आहेस. ही घेतलेली झेप किती महत्त्वाची आहे?
दिवसेंदिवस आपल्या कामगिरीत सुधारणा होते आहे, माझ्यासाठी हेच फार महत्त्वाचे आहे. हा सुखद आनंद आहे. जागतिक क्रमवारीतील दुसऱ्या स्थानाने मला अधिक बळ मिळाले आहे. यामुळे पुढील वाटचालीत निकाल काही लागला, तरी त्याचा संपूर्ण आत्मविश्वासाने सामना करेन.
जागतिक स्पध्रेतील पराभवामुळे रिओ ऑलिम्पिकसाठीची पहिली संधी हुकली. आता पुढील स्पध्रेत तुला रिओसाठी पुन्हा प्रयत्न करावे लागतील?
उजबेकिस्तानच्या मुरोड्जॉन अखमादालिव्ह विरुद्धच्या पराभावामुळे रिओ प्रवेश लांबणीवर गेला असला, तरी माझ्यातील आत्मविश्वास दुणावला आहे. तो मुकाबला अटीतटीचा होता आणि मी सर्वतोपरी प्रयत्न केले. पण नशीब प्रतिस्पर्धी खेळाडूसोबत होते. मी निराश नाही. रिओसाठी पुन्हा प्रयत्न करावे लागतील.
कराटेपटू ते बॉिक्सगपटू हा निर्णय कधी व का घेतलास?
माझे वडील कराटे मार्गदर्शक होते. त्यामुळे सुरुवातीपासून कराटेकडे माझा कल होता. सातव्या वर्षी कराटेला सुरुवात केली होती, पण मला माईक टायसन यांच्याकडून प्रेरणा मिळाली आणि ९व्या वर्षी बॉिक्सगची सुरुवात झाली. वडिलांनीही मला प्रोत्साहन दिले. टायसननंतर ते माझे आर्दश आहेत.
रिओसाठी तुझी तयारी कशी सुरू आहे?
संपूर्ण लक्ष रिओवर केंद्रित केले आहे. त्यामुळे रिओपूर्वी अधिकाधिक आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळण्यावर भर असेल.

Story img Loader