पुणेरी पलटणची बंगाल वॉरियर्सवर मात; दबंग दिल्लीचा धुव्वा उडवत यू मुंबा अव्वल स्थानी
यू मुंबाने स्टार स्पोर्ट्स प्रो कबड्डी लीगच्या तिसऱ्या हंगामात बुधवारी सलग दहाव्या विजयाची नोंद केली आणि घरच्या मैदानावर यंदा अपराजित राहण्याचा पराक्रम दाखवला. यू मुंबाने दुबळ्या दबंग दिल्लीला ३६-२० अशा फरकाने आरामात नमवून ६१ गुणांसह सलग दुसऱ्या वर्षी गुणतालिकेत अव्वल स्थान प्राप्त केले आहे. याचप्रमाणे दीपक निवास हुडाच्या चौफेर चढायांच्या बळावर पुणेरी पलटणने बलाढय़ बंगाल वॉरियर्सचा ४३-१९ असा आरामात पराभव केला आणि ४८ गुणांसह दिमाखात तिसरे स्थान मिळवले. त्यामुळे उपांत्य फेरीत यू मुंबाची बंगाल वॉरियर्सशी, तर पटणा पायरेट्सची पुणेरी पलटणशी गाठ पडणार आहे.
वरळीच्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमवर साखळी लढतींच्या अखेरच्या दिवशी एकतर्फी लढतींमुळे कबड्डीरसिकांची घोर निराशा झाली. पुण्याने १३व्या मिनिटाला पहिला लोण चढवून पहिल्या सत्रात २०-८ अशी आघाडी मिळवली. मग दुसऱ्या सत्रात २७व्या आणि ३९व्या मिनिटाला दोन लोण चढवून बंगालवर अंकुश ठेवला. पुण्याच्या दीपकने एक बोनस गुणासहित सर्वाधिक १३ गुणांची कमाई केली. तुषार पाटीलने चढायांमध्ये त्याला लक्ष्यवेधी साथ दिली, तर निलेश साळुंखेने दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीच्या काही मिनिटांत एका चढाईत चार गुण मिळवण्याची किमया साधली. बंगालकडून महेंद्र रजपूतने दमदार चढाया केल्या, विशेषत: गाफील राहणारा पुण्याचा कर्णधार मनजित चिल्लरला त्याने तीनदा बाद केले. बचावपटू गिरीश इर्नाकच्या अनुपस्थितीत या सामन्यात महेश गौडला दुखापत झाल्यामुळे बंगालचा संघ दुसऱ्या सत्रात अपेक्षित कामगिरी करू शकला नाही.
दुसऱ्या लढतीत प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या दिल्लीच्या दुसऱ्या फळीने यू मुंबाविरुद्ध चांगला खेळ केला. यू मुंबाच्या विजयात कर्णधार अनुप कुमार, रिशांक देवाडिगा आणि राकेश कुमारने महत्त्वाचे योगदान दिले. दिल्लीकडून कर्णधार सेल्वामणी के. याने अप्रतिम खेळ दाखवला.
उपांत्य फेरी
- ४ मार्च २०१६;
स्थळ : नवी दिल्ली
- यू मुंबा वि. बंगाल वॉरियर्स
- पटणा पायरेट्स वि. पुणेरी पलटण
- वेळ : रात्री ८ वाजल्यापासून.