पंजाब आणि बंगळुरुदरम्यान झालेल्या सामन्यातील एका निर्णयामुळे सध्या सोशल मीडियावर संताप व्यक्त होत आहे. रविवारी झालेल्या या सामन्यात डीआरएस निर्णयावरुन वाद निर्माण झाला आहे. या निर्णयामुळे बंगळुरुच्या देवदत्त पडीक्कलला पंजाबविरोधात झालेल्या सामन्यात जीवनदान मिळालं. आठवी ओव्हर सुरु असताना रवी बिष्णोईच्या गोलंदाजीवर खेळत असताना देवदत्त पडीक्कलने रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला. मात्र बॉल बॅटला लागला नाही. पंजाबचा कर्णधार आणि विकेटकिपर के एल राहुलने बॉलचा झेल घेतला आणि विकेटसाठी अपील केली. बॉल देवदत्तच्या हाताला लागला असून तो आऊट आहे यावर रवी आणि राहुल ठाम होते.

पण अम्पायरने त्यांची अपील फेटाळून लावली. यानंतर राहुलने डीआरएस घेतला. रिप्लेदरम्यान बॉल देवदत्तच्या ग्लोव्ह्जला स्पर्श करुन गेल्याचं दिसत होतं. पण थर्ड अम्पायर के श्रीनिवासन यांना मात्र खात्री नव्हती आणि त्यांनी बाद नसल्याचा निर्णय दिला.

अम्पायरने नॉट आऊट निर्णय दिल्याने के एल राहुल नाराज झाला आणि मैदानातील पंचांशी चर्चा केली. आयपीएल आणि पंजाबचे चाहतेदेखील या निर्णयामुळे नाराज झाले. न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू स्कॉट स्टायरिस यानेदेखील टीव्ही अम्पायरच्या निर्णयावर नाराजी जाहीर केली. थर्ड अम्पायरला तात्काळ हटवा असं ट्वीट करत त्याने संताप व्यक्त केला.

हा नॉट आऊट कसा काय? अशी विचारणा भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने केली.

पंजाब संघानेही अधिकृत ट्विटर अकाऊंटला ट्वीट करत निर्णयावर आश्चर्य व्यक्त केलं.

दरम्यान बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

Story img Loader