Prithvi Shaw In County Championship: भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ कौंटी चॅम्पियनशिपमध्ये नॉर्थम्प्टनशायरकडून खेळणार आहे. मुंबईच्या या खेळाडूने नॉर्थम्प्टनशायरशी करार केला आहे. तो सध्या दुलीप ट्रॉफीमध्ये खेळत असला तरी त्यानंतर तो नॉर्थम्प्टनशायरमध्ये सामील होईल. दुलीप ट्रॉफी स्पर्धेनंतर पृथ्वी शॉ इंग्लंडला रवाना होणार आहे. दुलीप ट्रॉफीचा शेवटचा सामना १२ ते १६ जुलैमध्ये खेळवला जाणार होता. अशा प्रकारे पृथ्वी शॉ प्रथमच कौंटी चॅम्पियनशिपमध्ये खेळताना दिसणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हा भारतीय दिग्गज खेळाडू पृथ्वी शॉपूर्वी नॉर्थम्प्टनशायरकडून खेळला आहे

पृथ्वी शॉ कौंटी चॅम्पियनशिपमध्ये खेळणार असल्याची अधिकृत घोषणा झाली नसली तरी लवकरच अधिकृत घोषणा केली जाईल असे मानले जात आहे. यापूर्वी बिशन सिंग बेदी, सौरव गांगुली आणि अनिल कुंबळे यांसारखे भारतीय दिग्गज नॉर्थहॅम्प्टनशायरकडून खेळले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पृथ्वी शॉ रॉयल लंडन वनडेमध्ये ४-दिवसीय सामन्यांव्यतिरिक्त नॉर्थम्प्टनशायरकडून खेळणार आहे. 

पृथ्वी शॉची कारकीर्द अशी आहे…

पृथ्वी शॉच्या कसोटी कारकिर्दीवर नजर टाकली तर या खेळाडूने आतापर्यंत ५ कसोटी सामने खेळले आहेत. या खेळाडूने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यात शतक झळकावले होते. पृथ्वी शॉने आपल्या कसोटी कारकिर्दीत ४२.३७ च्या सरासरीने ३३९ धावा केल्या आहेत. याशिवाय तो भारताकडून ६ एकदिवसीय सामने खेळला आहे. पृथ्वी शॉने ६ एकदिवसीय सामन्यांमध्ये ३१.५० च्या सरासरीने १८९ धावा केल्या आहेत. मागच्या रणजी ट्रॉफीच्या हंगामात त्याने आसाम विरुद्धच्या सामन्यात ३७९ धावा केल्या होत्या. या धावसंख्येने संजय मांजरेकर यांचा रेकॉर्ड मोडला होता. त्याने केलेली धावसंख्या ही रणजी इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम धावसंख्या होती. 

पृथ्वी शॉ आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळतो. देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळतो.  मात्र, पृथ्वी शॉसाठी आयपीएल २०२३ चा हंगाम काही खास राहिला नव्हता. यानंतर सपना गिलचा वाद खूप चर्चेत आला. मात्र, आता मुंबईच्या या खेळाडूने कौंटी चॅम्पियनशिपमध्ये नॉर्थम्प्टनशायरकडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी तो दुलीप ट्रॉफीनंतर इंग्लंडला रवाना होणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Controversial prithvi shaw will play in county cricket signed with northamptonshire team after duleep trophy avw