पीटीआय, पॅरिस

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय संघ दाखल झाल्यानंतर ऐनवेळेस कोरियन प्रशिक्षकास अधिस्वीकृती नाकारली. या घटनेनंतर संघासाठी एका घटनेत दोषी असलेल्या फिजिओला त्याच्या खर्चाने संघात स्थान दिल्यावरून तिरंदाजी संघाला दुसऱ्या वादाचा सामना करावा लागत आहे.

ऑलिम्पिकसाठी पॅरिसमध्ये दाखल झालेला भारतीय तिरंदाजी संघ प्रशिक्षक वूंग की आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते सर्वोच्च कामगिरी संचालक संजीव सिंग यांच्याशिवाय स्पर्धेच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. या दोघांनाही भारताच्या साहाय्यकांमध्ये स्थान देण्यात आलेले नाही. त्याच वेळी गेल्या वर्षी आयर्लंडमध्ये झालेल्या युवा जागतिक अजिंक्यपद स्पर्धेदरम्यान कॅनडाच्या किशोरवयीन मुलाशी अयोग्य दृष्टिकोन ठेवून वर्तन केल्याचा आरोप असलेल्या फिजिओ अरविंद यादव यांना सामावून घेण्यात आले आहे. भारतीय तिरंदाजी संघटनेच्या (एएआय) एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यानेच ही माहिती दिली. त्या स्पर्धेत भारताने सहा सुवर्ण, एक रौप्य, चार कांस्यपदकांची कमाई केली होती.

हेही वाचा >>>ऑलिम्पिक मोहिमेसाठी बीसीसीआयने उघडला खजिना; ८.५ कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा!

जागतिक तिरंदाजी स्पर्धेचे व्यवस्थापक थॉमस ऑबर्ट यांनी त्या वेळी समाजमाध्यमावरून यादव यांनी कॅनडाच्या मुलाशी अयोग्य वर्तन केल्याची तक्रार केली होती. तेव्हा भारतीय तिरंदाजी महासंघाच्या नैतिकता समितीच्या बैठकीत हे वर्तन सामान्य असल्याचे सांगून फेटाळण्यात आले होते. दरम्यान, अरविंद यादव यांनी हे आपल्याला बदनाम करण्याचे षड्यंत्र असल्याचे सांगितले. ‘‘स्पर्धेत असे काहीच घडले नाही आणि घडले होते, तर मग भारतीय महासंघाने माझ्यावर कारवाई का केली नाही. तिरंदाजांनीही माझ्या नियुक्तीवर आक्षेप घेतला असता,’’ असे यादव म्हणाले.

अरविंदने कायमच मागल्या दाराने भारतीय संघासोबत आपले नाव जोडले आहे. सचिव वीरेंद्र सचदेवा यांच्या जवळचा असल्याने त्याचे नाव सहज समाविष्ट करून घेतले जाते अशी टीका करून या सूत्राने भारतीय तिरंदाजी संघटनेमधील वाद एक प्रकारे समोर आणला. महासंघाचे अध्यक्ष अर्जुन मुंडा यांनीदेखील ऑलिम्पिकच्या तोंडावर नवा वाद उकरून काढू नका, तिरंदाजांनीच आग्रह धरल्याने त्याची निवड केल्याचे सांगितले.

एएआय’चे ‘आयओए’कडे बोट

प्रशिक्षक वूंग आणि संजीव सिंग यांना परवानगी नाकारण्यावरून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपात ‘एएआय’ने भारतीय ऑलिम्पिक संघटनेकडे (आयओए) बोट दाखवले आहे. ‘आयओए’ने सहा सदस्यीय संघासाठी चारपेक्षा अधिक साहाय्यक देता येणार नाही असे स्पष्ट करूनही ‘एएआय’ वूंग आणि संजीव सिंग यांच्यासाठी सातत्याने प्रयत्न करत होते. ‘आयओए’ने एक पाऊल मागे घेतले असते, तर या दोघांची नियुक्ती होऊ शकली असती, असे ‘एएआय’ने स्पष्ट केले. त्याच वेळी ‘एएआय’च्या एका गटाने अरविंद यादवच्या नियुक्तीवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केला. भारतीय ऑलिम्पिक संघासाठी ‘आयओए’ने डॉ. दिनेश पारडीवाला यांच्या मार्गदर्शनाखाली १३ सदस्यीय वैद्याकीय पथच पॅरिसमध्ये तैनात केले आहे. या पथकात फिजिओ, आहारतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ असे सर्वजण असताना ‘एएआय’ला वैयक्तिक फिजियो आणि मानसोपचारतज्ज्ञाची गरज का भासते असे एक पदाधिकारी म्हणाला. ‘एएआय’चे माजी पदाधिकारी अनिल कमिनेनी यांनी ‘आयओए’ने आपल्या कोटा प्रणालीचे पालन केले आहे. त्यामुळे अतिरिक्त प्रशिक्षक सामावून घेणे शक्यच नव्हते. हे सगळे बाजूला ठेवून आपण ऑलिम्पिकमध्ये कामगिरी कशी चांगली होईल याकडे लक्ष केंद्रित करूयात असे आवाहन केले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Controversy over arvind yadav appointment in archery team sport amy
Show comments