भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील जवळपास सारे विश्वविक्रम आहेत, त्याचे हे विक्रम कुणीही मोडू शकत नाही, असे म्हटले जात असले तरी सचिनचे विक्रम इंग्लंडचा कर्णधार अ‍ॅलिस्टर कुक मोडू शकतो, असे मत इंग्लंडचा धडाकेबाज फलंदाज  केव्हिन पीटरसन याने व्यक्त केले आहे.
‘‘माझ्या मते इंग्लंडचे सक्षम नेतृत्व करण्यासाठी कुक हा योग्य माणूस आहे. त्याने आतापर्यंत चांगली कामगिरी केली असून यापुढेही त्याच्याकडून यापेक्षा चांगली कामगिरी होईल, अशी अपेक्षा आहे. माझ्या मते सचिन तेंडुलकरचे विक्रम कुक हा मोडू शकतो, त्याच्या धावा आणि त्याचे वय पाहिल्यावर तुमच्या नक्कीच लक्षात येईल,’’ असे पीटरसनने म्हटले आहे.
सचिनच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये १५, ८३७ धावा आहेत, त्याच्यापेक्षा दोन हजार धावांनी पिछाडीवर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टिंग असून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. कुकच्या नावावर सध्या ८ हजार धावा जमा आहेत.
‘‘कुकने भारताविरुद्ध पदार्पण केले आणि ती मालिका आम्ही जिंकलो होतो. या मालिकेत त्याने चांगला खेळ केला, त्यानंतर कुकचा खेळ अधिकच बहरत गेला. त्याच्या कामगिरीत सातत्य राहिल्यास तो सचिनच्या विश्वविक्रमाला मागे टाकू शकतो,’’ असे पीटरसन म्हणाला.

Story img Loader