अ‍ॅशेस मालिका रुबाबदारपणे खिशात टाकली असली तरी यजमान इंग्लंडला खुणावतोय तो पाचव्या कसोटी सामन्यातील ऐतिहासिक विजय. आतापर्यंत इंग्लंडने आपल्या मातीत ऑस्ट्रेलियाला एकदाही ४-० अशा फरकाने पराभूत केलेले नाही. त्यामुळे बुधवारपासून सुरू होणाऱ्या अ‍ॅशेस कसोटी सामन्यात ही सुवर्णसंधी त्यांच्याकडे चालून आली आहे. एकीकडे मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतलेला इंग्लंडचा संघ या संधीचे सोने करण्यासाठी सज्ज असून दुसरीकडे प्रतिष्ठ राखण्यासाठी ऑस्ट्रेलियाकडे अखेरची संधी असेल.
दोन्ही संघांमध्ये गुणवत्ता असली तरी समन्वय आणि सातत्याचा अभाव या दोन गोष्टींमुळे मालिका इंग्लंडच्या बाजूने झुकलेली पाहायला मिळते. ऑस्ट्रेलियाच्या संघाला अजूनही लय सापडलेली दिसत नाही, तर दुसरीकडे विजयाच्या लाटेवर स्वार झालेला इंग्लंडचा संघ अखेरचा सामना जिंकून शेवट गोड करण्याच्या प्रयत्नात असेल.

Story img Loader