गोल करण्याच्या अद्भुत क्षमतेसाठी प्रसिद्ध नेयमार नव्या हंगामातही बार्सिलोना क्लबच्याच ताफ्यात राहणार आहे. आठ वर्षांनंतर डॅनी अल्वेस बार्सिलोनाला अलविदा करणार आहे. बार्सिलोनाचे संचालक रॉबर्ट फर्नाडिझ यांनी नेयमारविषयीच्या उलटसुलट चर्चाना पूर्णविराम दिला.
‘‘लवकरच बार्सिलोना आणि नेयमार यांच्यात नवा करार होणार आहे. करारावर स्वाक्षऱ्या झाल्यानंतर त्यासंदर्भात अधिकृत घोषणा करण्यात येईल,’’ असे फर्नाडिझ यांनी सांगितले.
स्पेनमधील कराराबाबतच्या जटिल नियमांमुळे नेयमार बार्सिलोना सोडणार अशा चर्चा रंगू लागल्या होत्या. यंदाच्या हंगामात नेयमारने बार्सिलोनाचे प्रतिनिधित्व करताना ४८ सामन्यांत ३१ गोल केले. नेयमार बार्सिलोनाकडे राहणार असला तरी अनुभवी डॅनी अल्वेस मात्र नव्या हंगामात अन्य संघाकडून खेळताना दिसेल. अल्वेस इटलीमधील ज्युव्हेंटस संघासाठी खेळणार असल्याची चर्चा आहे.
‘‘चाहत्यांचे अपार प्रेम मिळवलेला अल्वेस बार्सिलोनाच्या डावपेचांचा महत्त्वाचा भाग होता. मात्र त्याच्या वैयक्तिक निर्णयाचा आम्ही आदर करतो. नव्या वाटचालीसाठी त्याला मनापासून शुभेच्छा,’’ असे फर्नाडिझ यांनी सांगितले.

Story img Loader