मियामी : दक्षिण अमेरिकेतील फुटबॉलमधील ‘न भूतो’ कामगिरी करण्यासाठी अर्जेंटिनाचा संघ सज्ज झाला असून मोठ्या स्पर्धेत सलग तिसरे जेतेपद मिळवायचे झाल्यास त्यांना कोपा अमेरिका स्पर्धेच्या अंतिम लढतीत कोलंबियाचा अडथळा पार करावा लागेल. मियामी येथे होणारा हा सामना भारतीय वेळेनुसार सोमवारी पहाटे खेळवला जाणार आहे.
लिओनेल मेसीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाच्या संघाने २०२१ मध्ये झालेल्या गेल्या कोपा अमेरिका स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. त्यानंतर या संघाने जागतिक स्तरावर आपले वर्चस्व सिद्ध करताना २०२२ मध्ये ‘फिफा’ विश्वचषक जिंकला. त्यामुळे आता तिहेरी मुकुटाची अर्जेंटिनाकडे संधी आहे. तसेच अर्जेंटिनाने सामना जिंकल्यास ते उरुग्वेला (१५) मागे टाकून कोपा अमेरिका स्पर्धेतील आपले विक्रमी १६वे जेतेपद मिळवतील. तसेच खंडीय स्पर्धा सलग दोन वेळा आणि त्या दरम्यान विश्वचषक जिंकणारा अर्जेंटिना हा आंतरराष्ट्रीय फुटबॉलच्या इतिहासातील केवळ दुसराच संघ ठरेल. यापूर्वी स्पेनने ही किमया साधली होती. त्यांनी २००८ आणि २०१२ मध्ये युरो अजिंक्यपद, तर या दरम्यान २०१० मध्ये ‘फिफा’ विश्वचषकाचे जेतेपद पटकावले होते. मात्र, अमेरिकास खंडातील अन्य कोणत्याही संघाला अशी कामगिरी करता आलेले नाही.
हेही वाचा >>> युरो फुटबॉलच्या अंतिम लढतीत आज; स्पेनची तुल्यबळ इंग्लंडशी गाठ, विक्रमी चौकार की पहिले जेतेपद?
अर्जेंटिनाचा संघ प्रतिस्पर्धी कोलंबियाला कमी लेखण्याची चूक करणार नाही. कोलंबियाचा संघ गेले सलग २८ सामने अपराजित आहे. त्यांच्यासाठी हा राष्ट्रीय विक्रम आहे. यंदाच्या कोपा अमेरिका स्पर्धेत त्यांनी ब्राझीलला बरोबरीत रोखले, तर उपांत्य फेरीत उरुग्वेला पराभूत केले. त्यामुळे ते निश्चितपणे अर्जेंटिनाला कडवी झुंज देतील.
अर्जेंटिनाचा संघ जागतिक क्रमवारीत अग्रस्थान असून जेतेपदासाठी त्यांनाच प्रमुख दावेदार मानले जात आहे. मात्र, कोलंबियाचा कर्णधार हामेस रॉड्रिगेजला आता पूर्वीची लय सापडल्याने अंतिम सामन्यात त्याची भूमिका महत्त्वाची राहील. कोलंबियाने २००१ नंतर कोपा अमेरिका स्पर्धेचे जेतेपद मिळवलेले नाही. आता ही प्रतीक्षा संपवण्याचा त्यांचा मानस असेल. त्यामुळे हा सामना चुरशीचा होणे अपेक्षित आहे.
● वेळ : पहाटे ५.३० वा. (सोमवार)
तिसऱ्या स्थानासाठी आज लढत
कोपा अमेरिका स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकाची लढत आज, रविवारी खेळवली जाणार असून यात उरुग्वेची गाठ कॅनडाशी पडेल. उभय संघांत याआधी केवळ दोन सामने झाले असून दोन्ही वेळा उरुग्वेने बाजी मारली आहे. त्यामुळे या सामन्यातही उरुग्वेचे पारडे जड मानले जात आहे.
● वेळ : पहाटे ५.३० वा.
मेसीला मोठा पाठिंबा
अर्जेंटिना आणि कोलंबिया यांच्यातील अंतिम लढत मियामी, फ्लोरिडा येथील हार्ड रॉक स्टेडियमवर होणार आहे. मेसी क्लब फुटबॉलमध्ये सध्या इंटर मियामी संघासाठी खेळतो. त्यामुुळे या सामन्यात मेसीला आणि पर्यायाने अर्जेंटिनाला मोठा पाठिंबा मिळणे अपेक्षित आहे. यंदाच्या स्पर्धेत मेसीला सुरुवातीच्या सामन्यांत फारशी चमक दाखवता आली नाही. त्यातच त्याला दुखापतही झाली. मात्र, उपांत्य फेरीत कॅनडाविरुद्ध त्याने महत्त्वपूर्ण गोल नोंदवला.
© The Indian Express (P) Ltd