एकीकडे यूरो कप २०२० स्पर्धा रंगली असताना दुसरीकडे कोपा अमेरिका स्पर्धेला रंग चढू लागला आहे. आजपासून सुरु झालेल्या दोन वेगवेगळ्या सामन्यात ब्राझील आणि कोलंबियाने विजयी सलामी दिली. गट ‘अ’ मधील पहिला सामना ब्राझील आणि वेनेजुएला यांच्यात रंगला होता. या सामन्यात ब्राझीलने ३-० ने वेनेजुएलाचा पराभव केला. तर दुसरा सामना कोलंबिया आणि इक्वाडोर यांच्या रंगला होता. या सामन्यात कोलंबियाने इक्वाडोर संघाला १-० ने धुळ चारली. या विजयासह गट ‘अ’ मधील गुणतालिकेत ब्राझील आणि कोलंबिया संघाने प्रत्येकी तीन गुण मिळवले आहेत.

ब्राझील विरुद्ध वेनेजुएला सामन्यात २३ मिनिटाला ब्राझीलच्या मारक्विनोस याने गोल करत प्रतिस्पर्धी वेनेजुएला संघावर दडपण आणलं. त्यानंतर त्यांना यातून बाहेर पडण्याची संधीच दिली नाही. दुसऱ्या सत्रात ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेयमारने ६४ व्या मिनिटाला गोल झळकावला आणि ब्राझीलला २-० ने आघाडी मिळवून दिली. त्यानंतर ८९ व्या मिनिटाला गाब्रायल बारबोसाने गोल झळकावत ब्राझील ३ गोलने आघाडीवर नेलं. मात्र वेनेजुएलाच्या संघाला एकही गोल झळकावता आला नाही.

दुसरीकडे कोलंबिया आणि इक्वाडोर संघात अटीतटीचा सामना रंगला. या सामन्यात कोलंबियाने विजय मिळवला. पहिल्या सत्रात दोन्ही संघ गोल करण्यासाठी धडपड करत होते. ४२ व्या मिनिटाला कोलंबियाकडून एडविन कारडोना याने गोल केला आणि संघाला आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात इक्वाडोर संघाने आघाडी मिळवण्याच प्रयत्न केला. मात्र त्यांना अपयश आलं. कोलंबियाने हा सामना १-० ने जिंकला.

कोपा अमेरिका स्पर्धेतील ‘ब ‘गटातील पहिला सामना भारतीय वेळेनुसार उद्या रात्री २.३० वाजता अर्जेंटिना आणि चिले या संघात रंगणार आहे. तर दुसरा सामना पराग्वे आणि बोलिविया या संघात सकाळी ५.३० वाजता असणार आहे.

Story img Loader