वृत्तसंस्था, लास वेगास

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तारांकित आक्रमकपटू व्हिनिशियस ज्युनियरच्या अनुपस्थितीचा ब्राझीलला मोठा फटका बसला आणि रविवारी उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत उरुग्वेकडून पराभव पत्करावा लागल्याने ब्राझीलचे कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. नियमित वेळेतील गोलशून्य बरोबरीनंतर शूटआऊटमध्ये उरुग्वेने ४-२ अशी सरशी साधली. त्यामुळे १०व्यांदा कोपा अमेरिका जिंकण्याचे ब्राझीलचे स्वप्न आता पूर्ण होऊ शकणार नाही.

यंदाच्या स्पर्धेत दोन वेळा पिवळे कार्ड मिळाल्याने व्हिनिशियसला उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत खेळता आले नाही. त्याच्या अनुपस्थितीत १७ वर्षीय प्रतिभावान आक्रमकपटू एन्ड्रिकला सुरुवातीपासून खेळण्याची संधी मिळाली. मात्र, अतिशय आक्रमकपणे खेळणाऱ्या उरुग्वेसमोर त्याला फारसा प्रभाव पाडता आला नाही. कोपा अमेरिका स्पर्धा ही त्यातील संघांच्या अतिशय आक्रमक आणि धसमुसळय़ा खेळासाठी ओळखली जाते. ब्राझील आणि उरुग्वे यांच्यातील सामनाही अशाच पद्धतीने खेळला गेला. या सामन्यात तब्बल ४१ फाऊल झाले, ज्यापैकी २६ उरुग्वेने, तर १५ ब्राझीलने केले. तसेच ब्राझीलचा आक्रमकपटू रॉड्रिगोला धोकादायक पद्धतीने पाडल्यामुळे उरुग्वेच्या नाहितान नान्डेझला ७४व्या मिनिटाला लाल कार्ड दाखवण्यात आले. त्यामुळे उर्वरित सामन्यात उरुग्वेला १० खेळाडूंनिशी खेळावे लागले. मात्र, त्यानंतरही ब्राझीलला उरुग्वेचा भक्कम बचाव भेदता आला नाही.

हेही वाचा >>>IND vs ZIM 2nd T20 : रेकॉर्ड ब्रेकिंग विजयानंतर शुबमन गिलचे मोठे वक्तव्य; म्हणाला,”आज काय होणार आहे हे…”

दोन्ही संघांकडून गोलच्या संधी निर्माण करण्यापेक्षा प्रतिस्पर्धी संघाला रोखण्याचाच अधिक प्रयत्न झाला. त्यामुळे संपूर्ण सामन्यात दोन्ही संघांना मिळून केवळ चार फटके गोलच्या दिशेने मारता आले. ‘‘आम्ही गोलच्या अतिशय थोडय़ा संधी निर्माण करू शकलो याबाबत मी आनंदी आहे का, तर नक्कीच नाही. मात्र, विजय मिळवण्यासाठी जे आवश्यक होते ते केले,’’ असे सामन्यानंतर उरुग्वेचे प्रशिक्षक मार्सेलो बिएल्सा म्हणाले.

निर्धारित वेळेतील निराशाजनक खेळानंतर अखेर सामन्याचा निकाल लावण्यासाठी पेनल्टी शूटआऊटचा अवलंब करण्यात आला. यात उरुग्वेने ४-२ अशी बाजी मारताना उपांत्य फेरी गाठली. उरुग्वेला १९९२ पासून प्रथमच ब्राझीलविरुद्ध सलग दोन सामने जिंकण्यात यश आले आहे. गेल्या वर्षी विश्वचषक पात्रता फेरीतील सामन्यातही उरुग्वेने ब्राझीलला नमवले होते.

कोलंबियाची घोडदौड

’ कर्णधार हामेस रॉड्रिगेझच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर कोलंबियाने पनामाचा ५-० असा धुव्वा उडवत कोपा अमेरिका स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली.

’ कोलंबियाचा संघ सलग २७ सामने अपराजित आहे. त्यांच्या अप्रतिम खेळासमोर पनामाचा निभाव लागला नाही.

’ २०१४च्या विश्वचषकातील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर प्रकाशझोतात आल्यानंतर हामेस रॉड्रिगेझला कामगिरीत सातत्य राखता आले नाही. परंतु यंदाच्या कोपा अमेरिका स्पर्धेत त्याने पुन्हा आपली जुनी लय मिळवली आहे.

’ त्याने पनामाविरुद्ध एक गोल आणि दोन गोलसाहाय्य (असिस्ट) केले. रॉड्रिगेझच्या पासवर जहोन कोडरेबाबे (आठव्या मिनिटाला) कोलंबियाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर पूर्वार्धात रॉड्रिगेझ आणि लुईस डियाझ, तर उत्तरार्धात रिचर्ड रिओस आणि मिग्वाईल ब्रोजा यांनी गोल नोंदवत कोलंबियाचा मोठा विजय सुनिश्चित केला.

पेनल्टी शूटआऊट

    उरुग्वे                            ब्राझील           

फेडेरिको वाल्वर्डे 4          (१-०)   एडर मिलिटाओ ७

रॉड्रिगो बेन्टाकूर 4            (२-१)   आंद्रेआस पेरेरा 4

डे अरास्काएटा   4           (३-१)   डग्लस लुईझ ७

जोसे हिमेनेस ७   (३-२)   गॅब्रिएल मार्टिनेली 4

मॅन्यूएल उगार्ते 4  (४-२)  

उपांत्यपूर्व फेरीच्या लढती

अर्जेटिना वि. कॅनडा: बुधवार, १० जुलै

उरुग्वे वि. कोलंबिया: गुरुवार, ११ जुलै

’वेळ : पहाटे ५.३० वा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Copa america football tournament brazil challenge ends sport news amy
Show comments