अँजेंल डी’मारियाच्या दुहेरी धमाक्याच्या  बळावर लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखालील अर्जेटिनाने कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पॅराग्वे संघाला ६-१ अशा मोठय़ा फरकाने धूळ चारली आणि अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे.
बार्सिलोनाचा महानायक असलेल्या मेस्सीने संघाची उत्तम पद्धतीने मोट बांधली होती. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर गेल्या ९०० मिनिटांमध्ये त्याला एकही गोल करता आलेला नाही, ही त्याच्यासाठी गंभीर बाब समजली जात आहे. अर्जेटिनाकडून मारियाने दोन, तर मार्कोस रोजो, जेव्हियर पास्टोर, सर्गियो अग्युरो आणि गोन्झालो हिग्युएन यांनी प्रत्येकी एक गोल केला.
मँचेस्टर युनाटेडचा बचावपटू रोजो आणि पास्टोर यांनी अवघ्या २७ मिनिटांमध्ये संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली आणि पॅराग्वेला दुहेरी धक्के दिले. रोजोने १५व्या मिनिटाला आणि पास्टोरने २७व्या मिनिटाला गोल केले. त्यानंतर सामन्याच्या ३१व्या आणि ३९व्या मिनिटाला मेस्सीने पॅराग्वेवर जोरदार हल्ला चढवला होता, पण दोन्ही वेळी तो अपयशीच ठरला. त्यानंतर सामन्याच्या ४३ व्या मिनिटाला पॅराग्वेच्या एल बारोसने गोल करत अर्जेटिनाला धोका पोहोचवण्याचा प्रयत्न केला खरा, पण या गोलनंतर अर्जेटिनाने आपला बचाव अभेद्य करत पराग्वेला एकही गोल करण्याची संधी दिली नाही.
मध्यंतराला काही मिनिटे शिल्लक असताना पॅराग्वेने गोल केल्यामुळे दुसऱ्या सत्रात ते सामन्यात जोरदार पुनरागमन करतील, असे वाटत होते. पण अर्जेटिनाने एका बाजूने दमदार बचाव करत दुसऱ्या बाजूने जोरदार आक्रमणही लगावले. त्यामुळेच अर्जेटिनाला पॅराग्वेविरुद्ध मोठा विजय मिळवता आला.
मध्यंतराला अर्जेटिनाकडे २-१ अशी आघाडी होती. मध्यंतरानंतर दुसऱ्याच मिनिटाला डी’मारियाने गोल करत संघाची आघाडी वाढवली. या गोलनंतर फक्त सहा मिनिटांनीच मारियाने वैयक्तिक दुसरा गोल करत संघाची आघाडी वृद्धिंगत केली आणि अर्जेटिना पराभूत होणार नाही, हे जवळपास स्पष्ट झाले. सामन्याच्या ८०व्या मिनिटाला अग्युरोने आणि ८३व्या मिनिटाना हिग्युएनने गोल करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

गोलफलक
अर्जेटिना : ६ (मार्कोस रोजो १५, जेव्हियर पास्टोर २७, डी’मारिया ४७ आणि ५३, सर्गियो अग्युरो ८० आणि गोन्झालो हिग्युएन ८३).
’पराग्वे : १ (एल. बारिओस ४३).

Story img Loader