Sri Lanka Cricket Team: आशिया चषक २०२३ला फक्त एक आठवडा बाकी आहे, पण त्याआधीच मालिकेवर करोनाच संकट समोर आलं आहे. श्रीलंकेचे दोन खेळाडू कोविड पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. कोविड-१९चा कहर संपल्यानंतर क्रिकेटमधूनही सर्व प्रोटोकॉल काढून टाकण्यात आले, त्यानंतर खेळ सामान्यपणे सुरू झाले. पण श्रीलंका आणि पाकिस्तानमध्ये होणाऱ्या या मोठ्या कार्यक्रमापूर्वीच कोविडचा धोका समोर आला आहे.
श्रीलंकेचे पत्रकार दानुष्का अरविंदा यांनी दिलेल्या वृत्तानुसार, सलामीवीर अविष्का फर्नांडिस आणि संघाचा यष्टिरक्षक फलंदाज कुसल परेरा कोविड पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. आशिया कप २०२३ सुरू होण्यापूर्वी दोन्ही खेळाडूंची कोविड चाचणी करण्यात आली होती. त्यातून हे स्पष्ट दिसून आले की खेळाडूंना करोनाची लागण झाली आहे.
श्रीलंकेच्या संघातील खेळाडूंना करोनाची लागण होण्याची ही पहिलीच वेळ नाही. फर्नांडो आणि परेरा यांना आधीही करोनाची लागण झाली होती. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये श्रीलंका आणि झिम्बाब्वेच्या वन डे मालिकेपूर्वी फर्नांडिस यांची करोना चाचणी करण्यात आली होती, ज्यामध्ये कोविड-१९ लसीचा बूस्टर डोस दिल्यानंतरही त्याला संसर्ग झाल्याचे आढळून आले होते. दुसरीकडे, कुसल परेरा देखील २०२१मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी कोविड पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले होते.
यंदाचा हायब्रीड मॉडेलमध्ये होणारा आशिया चषक पाकिस्तान आणि श्रीलंकेत खेळवला जाणार आहे. श्रीलंकेचा संघ ३१ ऑगस्टपासून स्पर्धेतील आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. संघाचा पहिला सामना अफगाणिस्तान विरुद्ध कॅंडी, श्रीलंकेत होणार आहे. त्याआधी हे दोन खेळाडू कोविड-१९मधून पूर्णपणे बरे होतात का? हे पाहणे आवश्यक असणार आहे.
आशिया चषकाचा पहिला सामना मुलतानमध्ये होणार आहे
आशिया चषकाचे चार सामने पाकिस्तानात खेळवले जाणार असून अंतिम सामन्यासह नऊ सामने श्रीलंकेत खेळवले जाणार आहेत. यावेळी ही स्पर्धा ‘हायब्रीड मॉडेल’मध्ये होणार आहे. टीम इंडिया आपले सर्व सामने श्रीलंकेत खेळणार आहे. भारताची आशिया चषकात २ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. टीम इंडियाचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध कॅंडीच्या मैदानात होणार आहे.
स्पर्धेतील सहा संघांची प्रत्येकी दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. भारत, यजमान पाकिस्तान आणि नेपाळ अ गटात आहेत. तर ब गटात बांगलादेश, अफगाणिस्तान आणि श्रीलंका आहेत. सलामीचा सामना पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात मुलतान येथे ३० ऑगस्ट रोजी होणार आहे. त्याचवेळी, श्रीलंकेच्या भूमीवर पहिला सामना बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात ३१ ऑगस्ट रोजी कॅंडीमध्ये होणार आहे. अंतिम सामना १७ सप्टेंबर रोजी होणार आहे.