भारतासह देशभरात सध्या करोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. या व्हायरसशी दोन हात करण्यासाठी नागरिकांना घरात बसून राहण्याचा सल्ला देण्यात येतो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील या मुद्द्यावरून रविवारी ‘जनता कर्फ्यू’चे आवाहन केले होते. त्याला सर्वत्र उदंड प्रतिसाद मिळाला. पण कल्याणमध्ये मात्र काही तरूणांनी हा आदेश धाब्यावर बसवून क्रिकेट खेळण्याचा घाट घातला. अशा आठ जणांना जनता कर्फ्यू सुरु असताना क्रिकेट खेळल्याबद्दल पोलिसांनी अटक केली.

कल्याणच्या महात्मा फुले पोलीस चौकीच्या पोलिसांनी रविवारी जनता कर्फ्यू सुरु असताना मैदानात क्रिकेट खेळणाऱ्या आठ जणांना अटकेत टाकले. कफ्यू म्हणजेच जमावबंदीचे आदेश दिल्यानंतर ५ किंवा त्यापेक्षा अधिक लोकांनी एकत्र घराबाहेर असणे गुन्हा ठरतो. या आठ अतिउत्साही तरूणांनी थेट क्रिकेट खेळण्याचा घाट घालून मैदान गाठले. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार मुस्तकीम शेख, हामजा खान, अलताफ शेख, उमर शेख, इम्तियाज सय्यद, कुणाल फर्डे, हुसेन शेख आणि इमरान अशी त्यांची नावं आहेत.

पोलिसांनी दुपारी ही कारवाई केली. कल्याणच्या काळा तलाव मैदानावर हे आठ तरूण सरकारचे आदेश धुडकावून क्रिकेट खेळत असताना पोलिसांनी त्यांना अटक केली. अटक झाल्यानंतर काही वेळातच त्यांची जामिनावर सुटका करण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

Story img Loader