करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. डॉक्टर आणि रूग्णालयातील इतर सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे काही अंशी लोक करोनातून पूर्णपणे बरे होत आहेत. करोनाचा फटका क्रीडाक्षेत्रालाही बसला असून सर्व क्रीडा स्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत. याच दरम्यान क्रीडाक्षेत्रातून एक वाईट बातमी आली आहे. करोनाची लागण झालेल्या एका दिग्गज खेळाडूची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे.
सध्या करोनामुळे रुग्णांचा जगभरातील आकडा हा १५ लाखांपार पोहोचला आहे. तर मृतांचा आकडादेखील दिवसेंदिवस झपाट्याने वाढताना दिसत असून सध्या ९० हजारांहून अधिक लोकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. यात सकारात्मक बाब म्हणजे आतापर्यंत सुमारे साडे ३ लाख रूग्ण पूर्णपणे बरेदेखील झाले आहेत. परंतु या दरम्यान क्रीडाक्षेत्रातून करोनासंबंधी एक वाईट बातमी आहे.
करोनाच्या प्रार्दुभावामुळे आतापर्यंत काही खेळाडूंना प्राण गमवावे लागले आहेत. त्यात आता आणखी एका दिग्गज खेळाडूची भर पडली आहे. करोनाची लागण झालेले इंग्लंडचे दिग्गज फुटबॉलपटू नॉर्मन हंटर यांचे निधन झाले. लीड्स आणि इंग्लंडच्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघाचे त्यांनी प्रतिनिधित्व केले होते. करोना झाल्याने त्यांना गेल्या आठवड्यात रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र शुक्रवारी त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.
We’re extremely saddened to learn of the passing of Norman Hunter at the age of 76.
Norman was part of our @FIFAWorldCup-winning squad and won 28 caps for the #ThreeLions. All of our thoughts are with his family, friends and supporters at this time. pic.twitter.com/K7XQ2c7nJl
— England (@England) April 17, 2020
लीड्स संघाकडून ते १४ वर्षे फुटबॉल खेळले. १९६० आणि १९७० च्या दशकात त्यांनी सुमारे ७२६ सामने खेळले. १९६६ च्या फुटबॉल विश्वचषक विजेत्या इंग्लंड संघातही त्यांचा समावेश होता. “नॉर्मन यांना गेल्या आठवड्यात कोविड-१९ ची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांनी करोनाशी झुंज दिली. राष्ट्रीय वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या रूग्णालयातील डॉक्टर्स आणि सहकाऱ्यांनी खूप प्रयत्न केले, पण अखेर करोनाने त्यांचा बळी घेतला”, अशी माहिती लीड्स क्लबने दिली.