करोनाच्या तडाख्यामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. सध्याच्या घडीला भारतासह संपूर्ण जग करोना विषाणूविरोधात लढत आहे. भारताचा शेजारी देश पाकिस्तानमध्येही करोनामुळे हालाकीची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा खडतर परिस्थितीत भारताने पाकिस्तानसाठी व्हेंटिलेटर तयार करावेत, अशी विनंती माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरने केली आहे. त्यावरून नेटिझन्सने अख्तरला चांगलंच धारेवर धरलं आहे.

काय म्हणाला शोएब अख्तर?

“भारताने आमच्यासाठी १० हजार व्हेंटिलेटर बनवावेत. पाकिस्तान हे उपकार कधीच विसरणार नाही”, असे शोएबने पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. “भारतामधील लोकांनी मला जे प्रेम दिलं आहे, त्यासाठी मी त्यांचा कायम ऋणी राहीन. मी आतापर्यंत भारतात जेवढी कमाई केली, त्याच्या ३० टक्के रक्कम मी तिकडच्या गरीब लोकांमध्ये दान केली आहे. कित्येकदा टिव्ही स्टुडिओत काम करणाऱ्या गरीब कर्मचाऱ्यांनाही मी मदत केली आहे. माझा ड्रायव्हर, वॉचमन सगळ्यांची काळजी मी घ्यायचो. भारताने आमच्यासाठी १० हजार व्हेंटिलेटर बनवले, तर पाकिस्तान हे उपकार कधीच विसरणार नाही”, असे अख्तरने व्हिडीओत सांगितले.

यानंतर शोएब अख्तरचा नेटिझन्सने चांगलाच समाचार घेतला.

 

दरम्यान, नुकतेच शोएबने करोनाविरुद्ध लढ्यात निधी उभारण्यासाठी भारत-पाक क्रिकेट मालिका खेळवण्याची मागणी केली होती. “सध्याचा काळ सर्वांसाठी खडतर आहे, अशा परिस्थितीत मी दोन्ही देशांमध्ये ३ सामन्यांची मालिका खेळवण्यात यावी असा पर्याय सुचवतो आहे. या सामन्यांचा निकाल काय लागेल याकडे दोन्ही देशातील क्रिकेटप्रेमींनी गंभीरतेने पाहू नये. विराट कोहलीने शतक झळकावलं तर त्याचा आनंद पाकिस्तानातील लोकांना झाला पाहिजे, बाबर आझमने शतक झळकावल्यानंतर भारतामधील चाहते खुश झाले पाहिजेत. प्रदीर्घ कालावधीनंतर दोन्ही संघ पहिल्यांदाच क्रिकेट मालिका खेळत असल्यामुळे या सामन्यांना टिव्हीवर चांगली प्रेक्षकसंख्या लाभेल. यामधून मिळणारा निधी हा दोन्ही देशांच्या सरकारने करोनाविरुद्ध लढ्यात वापरावा”, असे त्याने सुचवले होते.