करोनाच्या भीतीमुळे संपूर्ण देशभरात २१ दिवसांकरिता पूर्णपणे संचारबंदी करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर (BCCI) IPL 2020 रद्द करण्यासाठी प्रचंड दबाव येत आहे. त्यामुळे सद्यस्थितीत IPL रद्द होण्याच्या मार्गावर असल्याचे बोलले जात आहे. मात्र असे असताना इंग्लंड आणि राजस्थान रॉयल्स संघाचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स याने नुकतेच आपण IPL खेळण्यासाठी आपण तयार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यावर सध्या तो चर्चेत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाला होता स्टोक्स?

IPL च्या बाबतच्या एका प्रश्नाला उत्तर देताना तो म्हणाला होता की आताच्या क्षणाला मी इतकंच सांगू शकतो की आता मी नजीकच्या जी स्पर्धा खेळेन ती IPL स्पर्धा असेल. IPL रद्द होण्याची शक्यता असली तरीही मला खेळण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार व्हावेच लागणार आहे. मला आतापासूनच तयारीला लागायला हवं आणि स्पर्धेत खेळण्याच्या दृष्टीने स्वत:ला शारीरिकदृष्ट्या तंदुरूस्त ठेवायला हवं. मी ३ आठवडे गप्प बसून अचानक २० एप्रिलला मैदानात खेळण्यासाठी उतरू शकत नाही. तसं कोणालाच जमणार नाही. कदाचित IPL खेळली जाईल आणि तसं झालं तर मला मागे राहायचं नाहीये. आम्हाला अनेक प्रकारचे सल्ले देण्यात आले आहेत. त्यामुळे जर IPL चे आयोजन करण्यात आले, तर मी नक्कीच योग्य तो निर्णय घेईन, असे स्टोक्सने सांगितले होते.

चाहत्याने स्टोक्सवर केली सडकून टीका

स्टोक्सच्या या संदर्भातील बातम्या स्टोक्स IPL खेळण्यासाठी उत्सुक अशा मथळ्याखाली झळकल्या. त्यामुळे चाहत्यांनी त्याच्यावर सडकून टीका केली. १.३ बिलियन नागरिक लॉकडाउनमध्ये आहेत. अशा परिस्थितीत पैशाचा नव्हे तर जीवांचा विचार कर असे स्टोक्सला एका चाहत्याने सुनावले. इतर काही चाहत्यांनीही त्याच्या सुरात सूर मिसळला.

स्टोक्सचे सडेतोड उत्तर

या गोंधळानंतर मात्र स्टोक्सने त्या संदर्भातील एक महत्त्वाचा फोटो पोस्ट केला आणि त्या चाहत्याला सांगितले की तुम्ही केवळ शीर्षक वाचत जाऊ नका, तर आतील बातमीही नीट वाचून पाहा. त्याच्या सांगण्यामागचा अर्थ म्हणजेच केवळ शीर्षकावरून बातमीचा अंदाज घेऊ नका, तर बातमी पूर्ण वाचा आणि मगच तुमची मतं ठरवा.

दरम्यान, ‘बीसीसीआय’ने काही दिवसांपूर्वीच आयपीएलचे आयोजन १५ एप्रिलपर्यंत लांबणीवर टाकले होते. करोनावर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले तरच आयपीएल स्पर्धा होणे शक्य होते. पण करोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धा एका वर्षाने पुढे ढकलण्यात आल्यानंतर सध्याची परिस्थिती आणखीनच खडतर होत चालली आहे, असे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली याने सांगितले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus outbreak lockdown in india ipl 2020 read articles not headlines ben stokes hits back at fan for ipl 2020 preparation remark vjb