पुढच्या माणसाला ठेच लागली, की मागचा माणूस शहाणा होतो व काळजीपूर्वक तो पाऊल टाकतो, असे आपण नेहमी म्हणत असतो. मात्र, आपल्या देशातील बॉक्सिंग संघटकांना याचा विसर पडला असावा. बॉक्सिंग क्षेत्राचे उच्चाटन होण्याची वेळ आली तरी ते आपापसात ठोसेबाजी करीत आहेत. आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाने अंतिम मुदत दिल्यानंतर आता राष्ट्रीय स्तरावर नवीन संघटना स्थापन होत आहे. देशातील सर्व संघटकांनी मतभेद विसरून खेळाच्या हितासाठी एकत्र येण्याची वेळ आली आहे.
बॉक्सिंग या खेळात ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये पदकांची लयलूट करण्याची भरपूर संधी उपलब्ध असते. पदके मिळविण्यासाठी आवश्यक असणारे नैपुण्य आपल्या देशात विपुल प्रमाणात उपलब्ध आहे. विजेंदरसिंग व मेरी कोम यांनी ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळवीत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या दोन्ही खेळाडूंनी बॉक्सिंग संघटनेकडून फारशी मदत न घेता हे यश मिळविले आहे. विजेंदर याच्याकडे आणखी एक ऑलिम्पिक पदक मिळविण्याची क्षमता निश्चित आहे. मात्र संघटनांमधील मतभेद व गलिच्छ राजकारणास वैतागूनच त्याने व्यावसायिक बॉक्सिंगचा रस्ता पकडला. मेरी कोम ही जगातील सर्वच क्रीडापटूंसाठी प्रेरणादायक खेळाडू मानली जाते. एकीकडे सांसारिक आघाडी सांभाळून तिने बॉक्सिंगचे करिअर केले आहे. दोन अपत्ये झाल्यानंतर तिने ऑलिम्पिक पदक मिळविले आहे. त्याखेरीज अनेक विश्वविजेतेपदे तिच्या नावावर आहेत. तिसरे अपत्य झाल्यानंतरही ती पुन्हा बॉक्सिंग रिंगमध्ये उतरली आहे.
आपल्या देशात मेरी कोम व विजेंदर यांच्यासारखेच कौशल्य असलेले अनेक खेळाडू आहेत, मात्र संघटनात्मक स्तरावर असलेले मतभेद व सत्तालोलुप वृत्तीमुळे या खेळाडूंचे कौशल्य मातीतच गाडले जात असते. राष्ट्रीय स्तरापासून स्थानिक स्तरापर्यंत सर्वच स्तरांवर दोन-तीन संघटना कार्यरत आहेत. आपल्या देशात ‘एक खेळ एक संघटना’ हे तत्त्व सर्रासपणे पायदळी तुडविण्यात आले आहे. खेळाच्या व खेळाडूंच्या विकासापेक्षा स्वत:कडे आणि स्वत:च्या पाठीराख्यांकडे कशी सत्ता राहील याचाच विचार या संघटना करीत असतात. दुर्दैवाने भारतीय ऑलिम्पिक महासंघ व राज्य स्तरावरील संघटना आपण कोणत्या संघटनेस पाठिंबा द्यायचा याच्याच संभ्रमात पडलेल्या आढळतात. या संघटकांच्या गोंधळात खेळाडूंची मात्र ससेहोलपट होताना दिसते. आपण कोणत्या संघटनेकडे सदस्य व्हायचे, हा प्रश्न खेळाडू व त्यांच्या प्रशिक्षकांना नेहमीच पडत असतो.
अंतर्गत कलह हा तर आपल्या देशातील क्रीडा क्षेत्रास असलेला शापच आहे. बॉक्सिंग क्षेत्र त्याला अपवाद नाही. गेली अनेक वर्षे मोठय़ा प्रमाणावर भांडणे सुरू आहेत. मात्र २०१२ मध्ये त्याची तीव्रता एवढी वाढली की, आंतरराष्ट्रीय महासंघाने भारतीय बॉक्सिंगवरच बंदीचा बडगा आणण्याचा इशारा दिला. २०१२ मध्ये राष्ट्रीय संघटनेच्या निवडणुकीत गैरप्रकार झाल्याची तक्रार आल्यानंतर आंतरराष्ट्रीय महासंघाने त्या संघटनेची मान्यता काढून घेतली व नव्याने संघटना स्थापन करण्याचे आदेश दिले. त्यानंतर बऱ्याच मेहनतीने नवीन संघटना उभी राहिली; तथापि त्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध बंडाळीचे निशाण उभे राहिले. वैयक्तिक अहमहमिका हेच या बंडाळीमागचे कारण होते. सातत्याने चाललेली भांडणे लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय महासंघाने भारतात राष्ट्रीय बॉक्सिंग संघटना स्थापन करण्यासाठी १४ मे ही मुदत दिली आहे. जर या मुदतीत नवीन संघटना कार्यरत झाली नाही तर भारतीय खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत देशाच्या ध्वजाखाली भाग घेता येणार नाही, असा इशाराच दिला आहे. या इशाऱ्यामुळे बॉक्सिंग संघटक खडबडून जागे झाले आहेत. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने नवीन संघटना स्थापन करण्यास हिरवा कंदील दाखविला आहे. आता बॉक्सिंग संघटकांवर आपापसातील मतभेदांना मूठमाती देत सन्मानाने एकत्र काम करण्याची जबाबदारी आली आहे. जर खेळाडू असतील तरच संघटना आहे, हे तत्त्व त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे.

 

मिलिंद ढमढेरे
millind.dhamdhere@expressindia.com