कोस्टा रिकाने इटलीसारख्या अनुभवी संघाचा केलेला पराभव हा सट्टेबाजारात चर्चेचा विषय बनला. फिफा विश्वचषकाच्या स्पर्धेतून स्पेन याआधीच अगदी अनपेक्षितरीत्या बाहेर फेकला गेला आहे. जागतिक क्रमवारीत पहिल्या पाचामध्ये नाव कमावणाऱ्या स्पेनवर भाव लावणाऱ्या पंटर्सना चांगलाच फटका बसला आहे. अजूनही भारतीय सट्टेबाजारात अनपेक्षित निकालांची पंटर्स वाट पाहत आहे. याच सदरात म्हटल्याप्रमाणे भारतीय सट्टेबाज खूपच सावध खेळी करीत आहेत. त्याच वेळी आंतरराष्ट्रीय सट्टेबाजारात खूपच रंगत येऊ लागली आहे. विविध संकेतस्थळांचा आढावा घेतला तर मोठय़ा प्रमाणात उलाढाल होत असल्याचे जाणकार सांगतात. आपल्याकडे सट्टा बेकायदा असल्यामुळे छुप्या रीतीने सट्टा सुरू आहे. विशेष म्हणजे अनेक पोलीसही या सट्टय़ावर आपले नशीब अजमावत आहेत. सट्टेबाजाराच्या जागतिक क्रमवारीत ब्राझील (१५/४) अद्यपही अग्रस्थानी आहे. त्यापाठोपाठ जर्मनी (४/१) आणि नंतर अर्जेटिनाचा (१७/४) क्रमांक लागतो. स्पनेला हरविल्यामुळे चौथा क्रमांक पटकावलेला नेदरलँड (१२/१) पुन्हा पाचव्या क्रमांकावर तर सहावा क्रमांक चिलीने (२२/१) घेतला आहे. हा क्रम सतत बदलत राहिला. जर्मनीचा शनिवारचा सामना या विश्वचषकाला कलाटणी देणारा ठरणार आहे, असे सट्टेबाजांरांना वाटत आहे. बाद फेरीत सट्टेबाजाराची आणखी रंगत सुरू होईल, असे सांगितले जाते. बादफेरीच्या सट्टय़ालाही आता जोर चढू लागला आहे.

आजचा भाव :
    अमेरिका    पोर्तुगाल
    चार रुपये (१९/४)    ८० पैसे (८/११)
    बेल्जिअम     रशिया
    ९० पैसे (१९/२०)    तीन रुपये (१०/३)
    दक्षिण कोरिया    अल्जेरिया
     ९० पैसे (११/८)    सव्वा रुपया (१२/५)
– निषाद अंधेरीवाला

गोल करा, झाडे लावा..
‘ग्लोबल वॉर्मिग’चे अनेक दुष्परिणाम सध्या साऱ्या जगावर दिसत आहेत. जैवसंवर्धन ही प्रत्येक देशापुढील समस्या आहे आणि ब्राझीलही त्याला अपवाद नाही. हरित विश्वचषकाचा निर्धार केलेल्या ब्राझीलने गोलच्या माध्यमातून झाडे वाढवण्याची अनोखी संकल्पना राबवली आहे. सॅल्व्हाडोरमधल्या फाँटे नोव्हा एरेना स्टेडियममध्ये होणाऱ्या सामन्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर गोल होत आहेत. बहिआच्या स्थानिक प्रशासनाने प्रत्येक गोलमागे १,१११ झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. प्रत्येक सामन्यात सरासरी पाच गोल धरल्यास विश्वचषकात प्रत्येक लढतीत होणाऱ्या २.८६ सरासरीपेक्षा हे प्रमाण जास्त आहे. शनिवारी सॅल्व्हाडोर येथे झालेल्या फ्रान्स-स्वित्र्झलड लढतीत तब्बल ७ गोल झाले. त्यामुळे येथे झालेल्या तीन सामन्यांत मिळून १७ गोल झाले आहेत. एवढय़ा प्रचंड संख्येमुळे किमान १८,८८७ झाडे रुजणार आहेत. सॅल्व्हाडोरमध्ये आणखी सामने होणार असल्याने झाडांचे आणि पर्यावरणाचे चिरंतन संवर्धन होणार आहे.
उरुग्वे की जान
चाहत्यांचे प्रेम हे खेळाडूंसाठी मोठी प्रेरणा असते. दमदार कामगिरी करण्यासाठी चाहत्यांचा जल्लोष, पाठिंबा निर्णायक ठरतो. इंग्लंडसारख्या मोठय़ा संघांना नमवण्याची किमया करणाऱ्या उरुग्वे संघालाही दर्दी चाहत्यांचा पाठिंबा मिळाला आहे हे सिद्ध करणारे हे दृश्य. उरुग्वेचा झेंडा चेहऱ्यावर रंगवलेला आणि उरुग्वेचा प्रमुख खेळाडू ल्युइस सुआरेझचे चित्र टीशर्टवर रेखाटलेला हा निस्सीम चाहता.

Story img Loader