कोस्टा रिकाने इटलीसारख्या अनुभवी संघाचा केलेला पराभव हा सट्टेबाजारात चर्चेचा विषय बनला. फिफा विश्वचषकाच्या स्पर्धेतून स्पेन याआधीच अगदी अनपेक्षितरीत्या बाहेर फेकला गेला आहे. जागतिक क्रमवारीत पहिल्या पाचामध्ये नाव कमावणाऱ्या स्पेनवर भाव लावणाऱ्या पंटर्सना चांगलाच फटका बसला आहे. अजूनही भारतीय सट्टेबाजारात अनपेक्षित निकालांची पंटर्स वाट पाहत आहे. याच सदरात म्हटल्याप्रमाणे भारतीय सट्टेबाज खूपच सावध खेळी करीत आहेत. त्याच वेळी आंतरराष्ट्रीय सट्टेबाजारात खूपच रंगत येऊ लागली आहे. विविध संकेतस्थळांचा आढावा घेतला तर मोठय़ा प्रमाणात उलाढाल होत असल्याचे जाणकार सांगतात. आपल्याकडे सट्टा बेकायदा असल्यामुळे छुप्या रीतीने सट्टा सुरू आहे. विशेष म्हणजे अनेक पोलीसही या सट्टय़ावर आपले नशीब अजमावत आहेत. सट्टेबाजाराच्या जागतिक क्रमवारीत ब्राझील (१५/४) अद्यपही अग्रस्थानी आहे. त्यापाठोपाठ जर्मनी (४/१) आणि नंतर अर्जेटिनाचा (१७/४) क्रमांक लागतो. स्पनेला हरविल्यामुळे चौथा क्रमांक पटकावलेला नेदरलँड (१२/१) पुन्हा पाचव्या क्रमांकावर तर सहावा क्रमांक चिलीने (२२/१) घेतला आहे. हा क्रम सतत बदलत राहिला. जर्मनीचा शनिवारचा सामना या विश्वचषकाला कलाटणी देणारा ठरणार आहे, असे सट्टेबाजांरांना वाटत आहे. बाद फेरीत सट्टेबाजाराची आणखी रंगत सुरू होईल, असे सांगितले जाते. बादफेरीच्या सट्टय़ालाही आता जोर चढू लागला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा