भारताच्या २० वर्षाखालील फुटबॉल संघाने बलाढ्य अर्जेंटिना संघाला हरवण्याचा पराक्रम करुन दाखवला आहे. भारतीय संघाने अर्जेंटिनाच्या संघाच्या २-१च्या फरकाने पराभव केला. भारतीय फुटबॉल संघाच्या औपचारिक ट्विट हॅण्डलवरून आज पहाटे साडेचार वाजता यासंदर्भातील माहिती देण्यात आली.

२० वर्षाखालील स्पर्धेमध्ये सहा वेळा विश्वविजेता राहिलेल्या अर्जेंटिना संघाला भारतीय संघाने स्पेनमधील COITF स्पर्धेमधील समान्यात धूळ चारली. सामन्याच्या चौथ्याच मिनिटाला दिपक तनगीरने गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. तर सामन्याच्या उत्तरार्धात ६८व्या मिनिटाला अन्वर अलीने भारतीय संघाचा स्कोअरबोर्ड २-०ने आघाडीवर नेला. त्यानंतर अर्जेंटिनाचा संघ दबावामध्ये खेळताना दिसला. त्यानंतर अवघ्या चार मिनिटांनंतर अर्जेंटिनाने आपला सामन्यातील पहिला आणि एकमेव गोल नोंदवला. भारतीय संघ या सामन्यात पहिल्या पासूनच आक्रामक पवित्रा घेताना दिसला. त्यातच पहिल्या चार मिनिटांमध्येच गोल नोंदवल्याने भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढलेला दिसला. मधल्या फळीतील भारतीय खेळाडूंनी चांगला खेळ करत गोल करण्याच्या अनेक संधी निर्माण केल्या.

भारताचा गोलकिपर प्रभाकरन गील याने अर्जेंटिना संघाने केलेले अनेक प्रयत्न परतवून लावले. त्यातही ५६व्या आणि ६१व्या मिनिटाला गीलने दाखवलेल्या चपळाईमुळे अर्जेंटिना संघाला बरोबर करण्याची संधी मिळाली नाही. पाच मिनिटांच्या एक्स्ट्रा टाइममध्ये अर्जेंटिना संघाने सामना बरोबरीत सोडवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी केलेला प्रयत्न गोल पोस्टला लागला. भारतीय खेळाडूंनी केलेल्या आक्रमाक खेळामुळेच भारताला हा ऐतिहासिक विजय मिळवता आला.

या विजयानंतर भारताचे क्रिडा मंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांनी भारतीय संघाचे ट्विटवरून अभिनंदन केले आहे. वेल डन असे म्हणत त्यांनी भारतीय संघाला शब्बासकी दिली आहे. तसेच भारतीय फुटबॉलचे भविष्य सुरक्षित हातांमध्ये असल्याचे त्यांनी आपल्या ट्वटिमध्ये म्हटले आहे.

५०व्या मिनिटाला अनिकेत जाधवला रेड कार्ड मिळाल्याने बाहेर जावे लागल्यानंतरही केवळ दहा खेळाडू मैदानात असूनही भराताने हा विजय खेचून आणला हे विशेष. या विजयामुळे भारतीय संघाचा आत्वविश्वास नक्कीच वाढला असून पुढील स्पर्धेत भारतीय संघाला याचा नक्कीच फायदा होईल.

विजेता भारतीय संघातील खेळाडू: प्रभाकरन गील (गोलकिपर), आशिष राय, जितेंद्र सिंग, अन्वर अली, साहिल पनवार, बोरिस सिंग तांगजाम, सुरेश सिंग वांगजाम, दिपक तनगीर, अरमीत सिंग कियाम (कर्णधार), निथोनांबा मिथाई, अनिकेत जाधव

Story img Loader