कोंगोनहास विमानतळाजवळ सुरू असलेल्या बांधकामापैकी एक लोखंडी खांब पडल्यामुळे मंगळवारी मोनोरेल कामगाराचा जागीच मृत्यू झाला. न्हाव्याच्या दुकानात छताला लटकत असलेल्या टीव्हीवर झळकणाऱ्या या बातमीकडे सर्वाचेच लक्ष लागले होते. गिऱ्हाईकाच्या चेहऱ्यासमोर वस्तरा घेऊन उभ्या असलेल्या न्हाव्यासहित सर्वाचेच श्वास रोखले गेले होते. अवेनिदा मार्केस डे साओ विन्सेन्ट येथील या न्हाव्याच्या दुकानासहित साओ पावलो फुटबॉल क्लब, सोसिएदाद इस्पोर्टिव्हो पाल्मेऱ्हास आणि इस्पोर्टे क्लब पिन्हेइरोस या शहरातील तीन अव्वल फुटबॉल क्लबमध्येही हेच चित्रण दाखवण्यात येत होते.
जसजसे घडय़ाळाचे काटे सरकत होते, तसतसा स्पेन आणि साल्वाडोर यांच्यात होणाऱ्या अखेरच्या सराव सामन्याकडे माझे लक्ष लागले होते. पण सलूनमधील वातावरण काहीसे गढूळ झाले होते. साओ पावलो येथे पोलिसांनी एका निदर्शकाची गोळ्या झाडून हत्या केल्याची बातमी झळकल्यावर या वातावरणात निराशेची भर पडत गेली. या बातमीनंतर एड्वाडरे या सलून मालकाची चॅनेल बदलण्यासाठी धडपड सुरू झाली. अखेर फुटबॉलचा सराव सुरू असलेल्या ता ना एरिना या चॅनेलवर येऊन तो स्थिरावला. ‘टाइम टू वॉच अवर बॉइज’ या कार्यक्रमात ब्राझील संघाचा सराव थेट दूरचित्रवाणीवर दाखवण्यात येत होता. विश्वचषक स्पर्धा असो वा नसो, ब्राझीलमध्ये राष्ट्रीय संघाच्या सराव शिबिराचे अनेक क्रीडा वाहिन्यांवर थेट प्रक्षेपण केले जाते. एका सामन्याप्रमाणेच या सराव शिबिरावर चर्चा, मतभेद केले जातात. त्यातच सोमवारच्या सराव शिबिरादरम्यान नेयमारचा डावा घोटा दुखावल्याची बातमी झळकू लागली. ही बातमी पाहून न्हाव्याच्या हृदयाचे ठोके वाढू लागले. तो अक्षरश: धापा टाकत बोलू लागला. नेयमार लवकरच बरा होईल, या आशेने एड्वाडरे शांत झाला. विश्वचषकादरम्यान ब्राझीलवासियांच्या नजरा या फक्त नेयमारवरच असणार आहेत.
सराव सुरू असताना एक चिमुरडा दूर उभ्या असलेल्या सुरक्षारक्षकांचे लक्ष नसताना ब्राझीलच्या खेळाडूंपाशी येऊ लागला. अखेर नेयमार त्या लहान मुलाला हाताला धरून डेव्हिड लुइझ आणि मायकॉन या आपल्या सहकाऱ्यांपाशी घेऊन आला. गोलजाळ्याजवळ या सर्वानी छायाचित्रण केल्यानंतर ही बातमी सर्वत्र झळकू लागली. नेयमारचा हा कार्यक्रम संपल्यानंतर मी एड्वाडरेला स्पेन सामन्याचा निकाल काय लागला, हे बघायला सांगितले (स्पेनने ही लढत २-०ने जिंकली होती). तेव्हा त्या न्हाव्याने डोळे वटारून माझ्याकडे कटाक्ष टाकला. ‘मोठी मुले सराव करत असताना तुम्ही मुलांचा सामना बघायला का सांगता’, असे पोर्तुगाल भाषेमध्ये सांगत एड्वाडरेने कोपरखळी मारली. ‘‘स्पेन हा जगातला सर्वोत्तम संघ आहे का? ते दक्षिण अमेरिकन आहेत का? येथे फक्त दक्षिण अमेरिकनविषयीच चर्चा केली जाते, विश्वचषकही दक्षिण अमेरिकेतील संघच जिंकेल.. तुम्ही बघाच!’’ असे रागानेच एड्वाडरे म्हणाला.
त्याचे म्हणणेही बरोबर होते. आतापर्यंत अमेरिकेत (उत्तर, मध्य आणि दक्षिण) सात वेळा झालेल्या विश्वचषक स्पर्धेत दक्षिण उपखंडातील संघानेच बाजी मारली आहे. या उपखंडात झालेल्या स्पर्धेत किंवा सामन्याच्या निकालावर घरच्या चाहत्यांचा पाठिंबा महत्त्वपूर्ण ठरत आला आहे. चिलीने १९६२मध्ये पहिल्यांदाच विश्वचषकाचे आयोजन केले होते, त्यावेळी त्यांनी उपांत्य फेरीत धडक मारून तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली होती. चिली त्यानंतर आतापर्यंत तशी कामगिरी करता आलेली नाही. १९७० आणि १९८६मध्ये मेक्सिकोने घरच्या मैदानावर दोन्ही विश्वचषक स्पर्धामध्ये उपांत्यपूर्व फेरीत मजल मारण्याची किमया केली होती. विश्वचषक जिंकणाऱ्या तीन लॅटिन अमेरिकन संघांमधील फक्त ब्राझीलला मायदेशात विश्वचषक जिंकता आलेला नाही. फुटबॉलच्या इतिहासातील या महत्त्वपूर्ण घडामोडींवर नजर टाकताना पोलिसांच्या गाडय़ांच्या सायरनचा आवाज येऊ लागला होता. अमेरिकन संघाचे आगमन झाल्याचे सोयरंसुतकही एड्वाडरेला नव्हते.