भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. पत्नी हसीन जहाँने शमीविरोधात चेक बाऊन्स झाल्याची तक्रार नोंदवली आहे. यावरुन अलिपूर येथील स्थानिक कोर्टाने शमीला 15 जानेवारीपर्यंत कोर्टासमोर हजर राहण्यासाठी समन्स बजावलं आहे.
काही दिवसांपूर्वी मोहम्मद शमी व त्याची पत्नी हसीन जहाँ यांच्यातले कौटुंबिक संबध बिघडले होते. हसीन जहाँने मोहम्मद शमीविरोधात घरगुती हिंसाचार व पैशासाठी छळ करत असल्याची तक्रार दाखल केली होती. यानंतर शमीने हसीन जहाँविरोधात घटस्फोटासाठीचा अर्ज दाखल केला होता. यानंतर शमीने हसीन जहाँला पोटगी म्हणून रक्कम देण्याचं मान्य केलं होतं, त्याच पोटगीचा चेक बाऊन्स झाल्यामुळे हसीन जहाँने ही तक्रार दाखल केल्याचं बोललं जातंय.
बुधवारी कोर्टासमोर झालेल्या सुनावणीत मोहम्मद शमीच्या वकिलांनी, शमीला कोर्टात हजर राहण्यासंबधी सूट देण्याची विनंती केली. मात्र कोर्टाने ही मागणी फेटाळत 15 जानेवारीपर्यंत शमीला स्वतः हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. कोर्टाच्या आदेशाचा अवमान केल्यास शमीविरोधात वॉरंट निघण्याचीही शक्यता आहे.