अवघ्या जगाचं लक्ष लागलेल्या आणि पुढच्या आठवड्यापासून सुरू होत असलेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसमोर मोठं संकट निर्माण झालं आहे. करोनामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या टोकियो ऑलिम्पिक-२०२० स्पर्धेत करोना विषाणूनं प्रवेश केला आहे. २३ जुलैपासून म्हणजेच स्पर्धा आठवड्यावर येऊन ठेपलेली असतानाच ऑलिम्पिक क्रीडानगरीत पहिला रुग्ण आढळून आला आहे. यामुळे खळबळ उडाली असून, या घटनेला आयोजकांनीही दुजारो दिला आहे. एक अधिकारी करोनाबाधित आढळून आला असून, त्याला क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

टोकियो ऑलिम्पिक २०२० स्पर्धा पुढील आठवड्यापासून (२३ जुलै) सुरू होत आहे. करोनामुळे गेल्या वर्षी स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती. यंदा ऑलिम्पिक स्पर्धा होत असून, करोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदाऱ्या घेण्यात आलेल्या आहेत. २३ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा चालणार असून, करोनानं ऑलिम्पिक स्पर्धेच्या दारावर थाप दिली आहे. स्पर्धेला सुरूवात होण्याआधीच ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये करोनाचा पहिला रुग्ण आढळून आला आहे.

हेही वाचा- जगभरातच तिसऱ्या लाटेचा धोका; व्ही. के. पॉल यांनी दिला सावधगिरीचा इशारा

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंसाठी उभारण्यात आलेल्या गावात पहिल्या करोना रुग्णाची नोंद झाली आहे. स्पर्धेच्या आयोजकांनी याची माहिती दिली आहे. करोनाबाधित रुग्ण आढळून आल्यामुळे पुढील आठवड्यापासून सुरू होत असलेल्या स्पर्धेसाठी चिंतेचा विषय असल्याचं आयोजकांनी म्हटलं आहे. “ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये एक व्यक्ती करोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. चाचण्या केल्या जात असताना संसर्ग झालेला रुग्ण आढळून आला असून, हा पहिलाच रुग्ण आहे”, अशी माहिती टोकियो ऑलिम्पिक समितीचे प्रवक्ते मासा टाकाया यांनी दिली. ही माहिती देत असताना टाकाया यांनी करोनाबाधित रुग्णांच्या देशाबद्दलची माहिती मात्र, गोपनीय ठेवली.

हेही वाचा- जाणून घ्या भारताचा ऑलिम्पिकमधील प्रवास!, १९०० ते २०१६ पर्यंत इतकी पदकं जिंकली

एका सदस्याला विमानतळावरूनच रुग्णालयात करण्यात आलं होतं दाखल

टोकियो ऑलिम्पिकसाठी शुक्रवारी नायजेरियाच्या खेळाडूंचं पथक नारिटा विमानतळावरून टोकियोला रवाना होणार होतं. पथकातील एक एक सदस्य करोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या व्यक्तीला सौम्य लक्षणं होती, मात्र वय जास्त असल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.