अन्वय सावंत
मुंबई : आई-वडिलांनी मला कायम पाठिंबा दिला. त्यांनी माझ्यावर अभ्यास करण्यासाठी दडपण टाकले नाही. त्यामुळे मला क्रिकेटला प्राधान्य देता आले. तसेच त्यांनी मला दिनेश लाड यांच्याकडे प्रशिक्षणासाठी पाठवले. लाड सरांचे कमी वयातच मार्गदर्शन लाभणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे ठरले. या सर्व गोष्टी जुळून आल्यामुळेच मला रणजी संघापर्यंतची वाटचाल करणे शक्य झाले आहे, असे मनोगत मुंबईचा विक्रमवीर फलंदाज सुवेद पारकरने व्यक्त केले.
२१ वर्षीय सुवेदने नुकतेच प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. रणजी करंडकातील उपांत्यपूर्व फेरीत त्याने उत्तराखंडविरुद्ध ४४७ चेंडूंत २५२ धावांची खेळी साकारली. त्यामुळे तो पदार्पणात द्विशतक करणारा अमोल मुझुमदारनंतर मुंबईचा केवळ दुसरा फलंदाज ठरला. ‘‘पदार्पणाचा सामना असल्याने मला डावाच्या सुरुवातीला दडपण जाणवत होते. मात्र, माझा केवळ खेळपट्टीवर टिकून राहण्याचा प्रयत्न होता. गोलंदाजाने चांगला चेंडू टाकून मला बाद करावे; पण मी स्वत: चुकीचा फटका मारून बाद होणार नाही, असा मी निर्धार केला होता. चेंडूगणिक माझा आत्मविश्वास वाढत गेला आणि मला मोठी खेळी साकारता आली,’’ असे सुवेद म्हणाला.
बोरिवलीच्यासुवेदने मंडपेश्वर सिव्हिक फेडरेशन (एमसीएफ) जिमखाना येथे सर्वप्रथम क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. त्याच्यातील गुणवत्ता पाहिल्यानंतर आई-वडिलांनी त्याला नामांकित क्रिकेट प्रशिक्षक लाड यांच्याकडे पाठवले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुवेदने क्रिकेटचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. त्याने शालेय क्रिकेटमध्ये स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय शाळेचे प्रतिनिधित्व केले. ‘‘मी वयाच्या नवव्या वर्षांपासून स्वामी विवेकानंद शाळेत जायला लागलो. मला कधीही सराव करायचा असला तरी लाड सर मैदानावर हजर असायचे. त्यांचे मार्गदर्शन माझ्यासाठी मोलाचे ठरले आहे,’’ असे सुवेदने सांगितले.
‘‘माझ्या यशात आई-वडिलांची खूप महत्त्वाची भूमिका आहे. त्यांनी मला कायम क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले. अभ्यास आवश्यक असला, तरी त्यांनी माझ्यावर त्यासाठी दडपण टाकले नाही. त्यांच्या पािठब्याविना मी कारकीर्दीच्या या टप्प्यापर्यंत पोहचू शकलो नसतो,’’ असे सुवेदने नमूद केले. ‘‘माझी आई राष्ट्रीय स्तरावरील खो-खो स्पर्धामध्ये खेळली आहे. त्यामुळे खेळ माझ्या रक्तातच होता असे म्हणायला हरकत नाही,’’ असेही तो गमतीत म्हणाला.
आनंद द्विगुणित!
द्विशतक आणि मुंबईचा विक्रमी विजय, हे दोन्ही पदार्पणाच्या सामन्यात घडल्याने सुवेदचा आनंद द्विगुणित झाला आहे. मुंबईने उत्तराखंडविरुद्धचा सामना तब्बल ७२५ धावांनी जिंकत प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सर्वात मोठय़ा विजयाचा विक्रम आपल्या नावे केला. ‘‘पदार्पणात द्विशतक होणे हे एखाद्या स्वप्नापेक्षा कमी नाही. त्यातच माझ्या कामगिरीमुळे मुंबईला विक्रमी विजय मिळवता आला याचे जास्त समाधान आहे. आगामी सामन्यांत अशीच दर्जेदार कामगिरी करत मुंबईला पुन्हा रणजीचा करंडक मिळवून देण्याचा माझा प्रयत्न असेल,’’ असे सुवेदने सांगितले.