Olympic 2028 Cricket: ऑलिम्पिकमध्ये अनेक विविध खेळांचा समावेश आहे, पण जगभरात सर्वात प्रसिद्ध असणाऱ्या क्रिकेटचा समावेश मात्र नव्हता. पण येत्या ऑलिम्पिक २०२८ मध्ये क्रिकेट खेळाचा समावेश करण्यात येण्याचे ऑलिम्पिक संघटनेने सांगितले होते. पण यादरम्यान आता एक नवी माहिती समोर येत आहे. ऑलिम्पिक २०२८चे आयोजन लॉस एंजिलिसमध्ये केले जाणार आहे. पण क्रिकेटचे सामने मात्र लॉस एंजिलिसमध्ये खेळवले जाणार नाहीत, यामागचे काय कारण आहे, जाणून घेऊया.
लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमधील क्रिकेट सामने न्यूयॉर्कमध्ये आयोजित केले जाऊ शकतात. लॉस एंजेलिसहून न्यूयॉर्कला जाण्यासाठी विमानाने सहा तास लागतात. टाइम झोनबद्दल बोलायचे झाल्यास, भारत न्यूयॉर्कपेक्षा ९.५ तास पुढे आहे, तर लॉस एंजेलिस १२.५ तास मागे आहे. टाइम्सच्या वृत्तानुसार, २०२८ च्या लॉस एंजेलिस गेम्सच्या आयोजन समितीचे अध्यक्ष केसी वासरमन यांनी टेक्सासमध्ये सांगितले की, भारतातील दर्शकांचा विचार करता क्रिकेट सामन्यांचे नियोजन केले जाईल.
लॉस एंजेलिस २०२८ मध्ये क्रिकेटचा समावेश करण्याचा मुख्य उद्देश दक्षिण आशियाई प्रेक्षकांना आकर्षित करणे आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला विशेषत: उपखंडात मोठ्या प्रसारण व्यवहारांची संधी मिळवणे हा होता. त्यामुळे न्यूयॉर्कमध्ये क्रिकेट सामने आयोजित केले जाऊ शकतात. नुकतेच न्यूयॉर्कने २०२४ च्या टी-२० विश्वचषकाचे सामने नासाऊ काउंटीमध्ये ड्रॉप-इन खेळपट्ट्यांसह तात्पुरत्या स्टेडियममध्ये आयोजित केले होते.
ब्रुकलिनच्या मरीन पार्कमध्ये सामने होण्याची शक्यता
तात्पुरत्या स्टेडियममध्ये झालेल्या काही सामन्यांमध्ये हवामानाने महत्त्वाची भूमिका बजावली. टाईम्सच्या म्हणण्यानुसार, मेजर लीग क्रिकेटमधील एमआय न्यूयॉर्कचे होम ग्राउंड ब्रुकलिन येथील मरीन पार्क येथे सामने होण्याची शक्यता आहे. दहा हजार आसनक्षमतेचे स्टेडियम बांधण्याचीही चर्चा सुरू आहे. पण ऑलिम्पिक २०२८ सुरू होण्यापूर्वी ते तयार होईल की नाही याबद्दल कोणतीही स्पष्टता नाही.
लॉस एंजिलिसऐवजी न्यूयॉर्कमध्ये जर क्रिकेट सामने खेळवले गेले तर खेळांचे आयोजन करणारे आणि सपोर्ट स्टाफची कमी पडू शकते. अलीकडच्या सामन्यांमध्ये एकूण खेळाडूंची संख्या दहा हजारच्या आसपास ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. क्रिकेट न्यूयॉर्कमध्ये खेळवले गेल्यास त्यातील काही समस्या दूर होऊ शकतात. आठ पुरुष आणि महिला संघांमध्ये प्रत्येकी १५ खेळाडू सदस्य असतील, प्रत्येक संघात पाच सपोर्ट स्टाफ असतील, ज्यामुळे दोन स्पर्धांसाठी एकूण ३२० लोक अपेक्षित आहेत.