ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने (CA) अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळण्यास नकार दिला आहे. ही मालिका मार्चच्या अखेरीस यूएईमध्ये खेळवली जाणार होती. मात्र तालिबानच्या काही निर्णयांच्या निषेधार्थ ऑस्ट्रेलियन बोर्डाने हे मोठे पाऊल उचलले. त्यामुळे मालिका खेळण्यास नकार दिला आहे.
वास्तविक, ऑस्ट्रेलियन संघाला फेब्रुवारीमध्ये भारत दौऱ्यावर चार कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे. यानंतर यूएईमध्ये पोहोचल्यानंतर अफगाणिस्तान संघाविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिकाही नियोजित होती. पण ऑस्ट्रेलियन संघ यापुढे ही मालिका खेळणार नाही.
अफगाणिस्तानात महिलांवर अनेक निर्बंध –
अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आहे. त्यांनी आपल्या देशातील महिला आणि मुलींवर अनेक बंधने लादली आहेत. त्यांना अभ्यासासोबत घराबाहेर काम करण्याचाही अधिकार नाही. मुलींना खेळात सहभागी होण्यासही बंदी घालण्यात आली आहे. तालिबानच्या या निर्णयाच्या निषेधार्थ ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने क्रिकेट मालिका न खेळवण्याचा निर्णय घेतला आहे.
ऑस्ट्रेलियन बोर्डानेही आपल्या निवेदनात याच गोष्टीचा उल्लेख केला आहे. बोर्डाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले, ”अफगाणिस्तानसह जगभरातील महिला आणि पुरुषांना खेळात आणण्यासाठी आणि त्यांच्या विकासासाठी सीए कटिबद्ध आहे. तसेच त्यांच्या देशातील महिला आणि मुलींची स्थिती सुधारण्यासाठी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या सतत संपर्कात आहे.”
आयसीसीनेही या प्रकरणांवर चिंता व्यक्त केली –
सीएने देखील आपल्या ऑस्ट्रेलियन सरकारचे समर्थन केल्याबद्दल आभार मानले आहेत. ते म्हणाले, ‘आमच्या निर्णयाला (अफगाणिस्तानकडून मालिका रद्द करण्याच्या) समर्थन केल्याबद्दल धन्यवाद.’ अलीकडेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) सीईओ ज्योफ अॅलार्डिस यांनीही अफगाणिस्तानमधील या वाढत्या प्रकरणांबद्दल चिंता व्यक्त केली होती.
हेही वाचा – Jay Shah Tweet: पृथ्वी शॉचे कौतुक करणे जय शाहांना पडले चांगलेच महागात; आता होत आहेत ट्रोल, जाणून घ्या कारण
अफगाणिस्तान संघाला वनडे सुपर लीग अंतर्गत गुण मिळणार –
अफगाणिस्तान हा आयसीसीचा एकमेव पूर्ण सदस्य आहे, जिथे महिला संघ नाही. १४ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या अंडर-१९ महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तान संघाचा समावेश करण्यात आलेला नाही. तर, ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान एकदिवसीय मालिकेबद्दल बोलताना, ती मालिका आयसीसी एकदिवसीय सुपर लीग अंतर्गत खेळली जाणार होती.
हेही वाचा – Athiya Rahul Wedding: अथिया-राहुलच्या लग्नाबद्दल सुनील शेट्टीचा महत्त्वाचा खुलासा; म्हणाला, ‘त्या दोघांना…’
म्हणजेच, विजेत्या संघाला एकदिवसीय विश्वचषक अंतर्गत होणाऱ्या आयसीसी एकदिवसीय सुपर लीगचे गुण मिळवायचे होते. पण आता ऑस्ट्रेलियाने हे मालिका रद्द केल्याने अफगाणिस्तानच्या खात्यात मालिकेतील ३० टक्के गुण जमा होतील.