Border Gavaskar Trophy 2024 Schedule Announced : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दरवर्षी होणाऱ्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीचे वेळापत्रक क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जाहीर केले आहे. भारतीय क्रिकेट संघ २०२४ मध्ये म्हणजेच या वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. दोन महिन्यांच्या या दौऱ्यातील पहिला सामना २२ नोव्हेंबरपासून खेळवला जाणार आहे. पर्थ स्टेडियमवर पहिला सामना होणार आहे. त्याच वेळी, ॲडलेड ओव्हल मैदानावर दिवस-रात्र गुलाबी चेंडूने कसोटी सामना खेळवला जाईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी मालिका २०२४ मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ५ सामने खेळवले जाणार आहेत. ३२ वर्षांनंतर भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहेत. शेवटची ५ सामन्यांची मालिका १९९१-९२ मध्ये खेळली गेली होती. यजमान ऑस्ट्रेलियाने ही मालिका ४-१ ने जिंकली. मात्र, या मालिकेतील सिडनी येथे झालेल्या कसोटीत रवी शास्त्रीने द्विशतक झळकावले होते आणि युवा सचिन तेंडुलकरने पर्थच्या खेळपट्टीवर शतक झळकावले होते, ज्यात त्याने ११४ धावांची संस्मरणीय खेळी खेळली होती.

मालिकेला पर्थमधून होणार सुरुवात –

या मालिकेची सुरुवात २२ नोव्हेंबरपासून पर्थ येथे होणाऱ्या सामन्याने होईल, जी २६ नोव्हेंबरपर्यंत खेळवली जाईल. यानंतर मालिकेतील दुसरा सामना ६ ते १० डिसेंबर दरम्यान ॲडलेड ओव्हल येथे खेळवला जाईल. हा सामना दिवस-रात्र कसोटी असेल. तिसरा कसोटी सामना १४ ते १८ डिसेंबर दरम्यान ब्रिस्बेनमधील गाबा मैदानावर होणार आहे. त्याचवेळी, चौथ्या सामन्यात दोन्ही संघ २६-३० डिसेंबर दरम्यान मेलबर्नमध्ये आमनेसामने येतील. या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना ३ ते ७ जानेवारी दरम्यान सिडनी क्रिकेट मैदानावर होणार आहे.

हेही वाचा – IPL 2024: पंजाबने ‘चुकून’ खरेदी केलेल्या शशांकची सिंगची ८ चेंडूत २१ धावांची वादळी खेळी, वाचा लिलावात नेमकं काय झालं होतं?

पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेचे वेळापत्रक –

पहिली कसोटी: २२-२६ नोव्हेंबर: पर्थ स्टेडियम, पर्थ
दुसरी कसोटी: ६-१० डिसेंबर: ॲडलेड ओव्हल, ॲडलेड (दिवस-रात्र कसोटी)
तिसरी कसोटी: १४-१८ डिसेंबर: गाबा, ब्रिस्बेन
चौथी कसोटी: २६-३० डिसेंबर: मेलबर्न क्रिकेट ग्राउंड, मेलबर्न
पाचवी कसोटी: ३-७ जानेवारी: सिडनी क्रिकेट ग्राउंड, सिडनी

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cricket australia has announced the schedule for five test border gavaskar trophy 2024 between india and australia vbm