भारताविरुद्धच्या २००८मधील कसोटी मालिकेदरम्यान झालेल्या ‘मंकीगेट’ प्रकरणात ऑस्ट्रेलियाच्या मंडळाने माझे आणि संघाचे खच्चीकरण केले, कारण त्यांना त्या वेळी खेळाडूंपेक्षा भारताबरोबर असलेले नाते महत्त्वाचे वाटले, असा आरोप ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग याने केला आहे.
पॉन्टिंगचे ‘अॅट दी क्लोज ऑफ प्ले’ या आत्मचरित्राचे ‘दी एज’ हे प्रकाशक आहेत. या आत्मचरित्रामध्ये ‘मंकीगेट’ प्रकरणाबद्दलचे मत पॉन्टिंगने व्यक्त केले आहे. ‘‘मला ‘मंकीगेट’ प्रकरणाचा थांग लागत नाही, कारण या वेळी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने प्रथमच भारताबरोबरचे नाते जोपासण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी आमच्याशी संवाद साधला. या वेळी त्यांनी माझ्याबरोबरच संघाचेही खच्चीकरण केले. मला अजूनही जे घडले ते विसरणे शक्य नाही,’’ असे पॉन्टिंग म्हणाला.
‘‘या प्रकरणामधील पॉन्टिंगला सचिन तेंडुलकरची भूमिका समजली नाही. सचिन या प्रकरणाच्या सुनावणी वेळी हजर होता, पण त्याने सामनाधिकारी माइक प्रॉक्टर यांनी हरभजनला शिक्षा सुनावताना एकही शब्द काढला नाही. अष्टपैलू अॅन्ड्रय़ू सायमंड्सवर टिप्पणी केल्याप्रकरणी सामनाधिकारी प्रॉक्टर यांना सचिन काहीही बोलला नाही,’’ असे पॉन्टिंग म्हणतो.
‘‘सचिनसारखा सहजपणे आणि तांत्रिकदृष्टय़ा सक्षमपणे खेळ करणारा खेळाडू मी पाहिला नाही, पण सचिनपेक्षा लारामध्ये सामना जिंकवून देण्याची क्षमता जास्त होती.’’
रिकी पॉन्टिंग

Story img Loader