Cricket Australia selected squad for WTC 2021-23: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३ चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ७ जूनपासून खेळला जाणार आहे. हा सामना लंडनमधील ओव्हल मैदानावर खेळला जाईल, परंतु त्यापूर्वी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्पर्धेसाठी एक अनधिकृत संघ निवडला आहे. या संघात, सीएने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२१-२३ सायकलमध्ये कसोटी क्रिकेट खेळलेल्या संघातील खेळाडूंची निवड केली आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने निवडलेल्या संघात ऑस्ट्रेलिया आणि भारताचे प्रत्येकी तीन, इंग्लंडचे दोन आणि पाकिस्तान, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघातील प्रत्येकी एका खेळाडूचा समावेश आहे.
बाबर आझमला संघात स्थान देताना विराट-रोहितला वगळले –
सीएने निवडलेल्या संघात भारतीय दिग्गज विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना स्थान देण्यात आले नाही. भारतीय खेळाडूंमध्ये ऋषभ पंत, रवींद्र जडेजा आणि आर अश्विन यांचा समावेश आहे. या संघात पाकिस्तानच्या बाबर आझमला स्थान दिले आहे. त्याचबरोबर सीएने या संघात इंग्लंडच्या जो रूट आणि अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनला स्थान दिले आहे.
कर्णधार म्हणून पॅट कमिन्सची केली निवड –
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पॅट कमिन्सला या संघाचा कर्णधार बनवले आहे. त्याचबरोबर भारताच्या ऋषभ पंतचा यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून संघात समावेश केला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने निवडलेल्या या संघात ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघातील तीन खेळाडूंचा समावेश आहे, त्यात सलामीवीर फलंदाज उस्मान ख्वाजा, ट्रॅव्हिस हेड आणि वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स यांचा समावेश आहे. पॅट कमिन्स हा सध्या ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा कर्णधार आहे. श्रीलंकेचा सलामीवीर दिमुथ करुणारत्नेला या संघात स्थान देण्यात आले, तर दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाही या संघात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला आहे.
डब्ल्यूटीसी २०२१-२३ साठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने निवडलेला संघ –
उस्मान ख्वाजा, दिमुथ करुणारत्ने, बाबर आझम, जो रूट, ट्रॅव्हिस हेड, रवींद्र जडेजा, ऋषभ पंत (विकेटकीपर), आर अश्विन, पॅट कमिन्स (कर्णधार), कगिसो रबाडा, जेम्स अँडरसन.