न्यूझीलंड आणि इंग्लंडने सुरक्षेचा कारणास्तव पाकिस्तानचा दौरा रद्द केल्यानंतर पाकिस्तानची जगभरात नाच्चकी झाली होती. त्यानंतर आता ऑस्ट्रेलिया संघ पुढच्या वर्षी पाकिस्तान दौरा करणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. या दौऱ्यात ऑस्ट्रेलिया पाकिस्तान दरम्यान तीन कसोटी सामने, ३ एकदिवसीय सामने आणि एक टी २० सामना होणार आहे.

“पाकिस्तानमध्ये ऑस्ट्रेलियाचं स्वागत करताना मला आनंद होत आहे. या दौऱ्यात तीन कसोटी, तीन एकदिवसीय आणि एक टी २० सामना असेल. या दौऱ्यामुळे क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. ऑस्ट्रेलिया चांगली कामगिरी करणाऱ्या संघांपैकी एक आहे. २४ वर्षांनंतर आमच्या येथे येणार असल्याने क्रीडाप्रेमींसाठी खास भेट असेल. ऑस्ट्रेलियाला फक्त खेळण्याचीच नाही तर पाकिस्तान एक महान देश असल्याची अनुभूतीही मिळेल. आदर, प्रेम आणि आदरतिथ्य घेण्याची एक उत्तम संधी आहे. जी मागील पिढीतील बहुतेक क्रिकेटपटूंनी गमावली आहे.”, असं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा यांनी सांगितलं. मालिकेपूर्वी क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे एक शिष्टमंडळ पीसीबी अधिकारी आणि फेडरल अधिकाऱ्यांना भेटेल आणि टीम ऑपरेशन्स, सुरक्षा आणि कोविड १९ प्रोटोकॉल संदर्भात चर्चा करेल आणि अंतिम निर्णय घेणार आहे.

“पुढच्या वर्षी पाकिस्तान दौऱ्यासाठी आम्ही खूप उत्साहित आहोत. ही एक उच्च प्रतीची मालिका असेल आणि संघासाठी अविश्वनीय ठरेल.”
ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तानचा शेवटचा दौरा १९९८-९९ मध्ये झाला होता. आता जवळपास २४ वर्षानंतर ऑस्ट्रेलिया पाकिस्तानात जाणार आहे.

सुरक्षेचं कारण देत न्यूझीलंडने पाकिस्तान दौरा रद्द केला होता. न्यूझीलंड आणि पाकिस्तान संघात तीन एकदिवसीय आणि पाच टी २० सामन्यांची मालिका खेळली जाणार होती. शेवटच्या क्षणी न्यूझीलंडने माघार घेतल्याने पाकिस्तानची नाचक्की झाली होती. न्यूझीलडंने माघार घेतल्यानंतर इंग्लंडनेही सुरक्षेच्या कारणास्तव आगामी पाकिस्तान दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. इंग्लंडचे पुरुष आणि महिला असे दोन्ही संघ पाकिस्तानमध्ये मर्यादित षटकांचे सामने खेळणार होते.

Story img Loader