टीम इंडियाचा यशस्वी कर्णधार विराट कोहली याला सिएट क्रिकेट रेटिंग पुरस्कारांमध्ये सर्वोकृष्ट फलंदाज पुरस्काराने गौरविण्यात आले, तर IPL च्या यंदाच्या हंगामात अंतिम सामन्याचा सामनावीर ठरलेला जसप्रीत बुमराह याला सर्वोत्कृष्ट गोलंदाज पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यात २०१८-१९ या कालावधीत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना पुरस्कार देण्यात आले. माजी क्रिकेटपटू मोहिंदर अमरनाथ यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
‘मला हा पुरस्कार मिळणे हे माझे भाग्यच आहे.’ अशी भावना अमरनाथ यांनी व्यक्त केली. १९८३ च्या विश्वविजेत्या संघात त्यांचा समावेश होता. त्या स्पर्धेत भारताच्या विजयामध्ये अमरनाथ यांनी मोलाचा वाटा उचलला होता होता. त्यांना हा पुरस्कार माजी कर्णधार आणि अमरनाथ यांचे तत्कालीन सहकारी सुनील गावस्कर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याशिवाय, यंदाच्या विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाबाबतही त्यांनी मत व्यक्त केले.
”विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघात अफाट क्षमता आणि अनुभव आहे. मात्र योग्य वेळी कामगिरीत चमक दाखवण्याची गरज आहे. भारताकडे अनुभवी खेळाडू आहेत, मात्र योग्य क्षणी त्यांना लय सापडणे गरजेचे आहे. हार्दिक पांड्याकडे क्षमता आहे, मात्र त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ती सिद्ध करून दाखवण्याची आवश्यकता आहे. विश्वचषकाशी IPL ची तुलना करणे अयोग्य आहे. झटपट क्रिकेटच्या प्रकारात मोडणाऱ्या ‘आयपीएल’चे स्वरूप वेगळे आहे. इंग्लंडमधील वातावरणाशी जुळवून घेत त्यानुसार कामगिरी करणे आवश्यक आहे. जसप्रीत बुमराहकडे विविधता असून भारतासाठी तो महत्त्वाचा गोलंदाज ठरू शकतो, असे अमरनाथ म्हणाले.
ऑस्ट्रेलियामधील कसोटी दौरा गाजवणारा आणि कसोटी मालिकेत मालिकावीराचा किताब पटकावणाऱ्या चेतेश्वर पुजारा याला सर्वोकृष्ट कसोटीपटू तर सलामीवीर रोहित शर्मा याला सर्वोत्कृष्ट एकदिवसीय क्रिकेटपटू पुरस्कार देण्यात आले.
पुरस्कार विजेते –
जीवनगौरव पुरस्कार – मोहिंदर अमरनाथ
आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आणि सर्वोत्तम फलंदाज – विराट कोहली
आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम गोलंदाज – जसप्रीत बुमराह</p>
आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम कसोटीपटू – चेतेश्वर पुजारा
आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू – रोहित शर्मा
आंतरराष्ट्रीय टी-२० सर्वोत्तम क्रिकेटपटू – ऍरॉन फिंच
उल्लेखनीय कामगिरी – कुलदीप यादव</p>
आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम टी २० गोलंदाज – रशीद खान
देशांतर्गत सर्वोत्तम खेळाडू – आशुतोष अमन
आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू – स्मृती मंधाना
सर्वोत्तम युवा (कनिष्ठ) क्रिकेटपटू – यशस्वी जैस्वाल
क्रिकेट पत्रकारिता पुरस्कार – श्रीराम वीरा आणि स्नेहल प्रधान
विशेष मानवंदना – स्व. अजित वाडेकर