नवी दिल्ली : क्रिकेट अफगाणिस्तान खूप महत्त्व राखून आहे. क्रिकेटने अफगाणिस्तानमधील जनतेला आनंदी केले. पण यानंतरही कुणाला आमच्यासोबत द्विपक्षीय मालिका खेळायची नसेल, तर आम्ही काही करू शकत नाही. हा ज्याचा त्याचा विचार करण्याचा प्रश्न आहे, असे अफगाणिस्तान क्रिकेटचा कणा असलेल्या रशीद खानने सांगितले.

रशीदचा सगळा रोख ऑस्ट्रेलियाकडे होता. ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानविरुद्ध अलीकडेच द्विपक्षीय मालिका खेळण्यास नकार दिला आहे. तालिबानशासित अफगाणिस्तानात महिलांना चांगली वागणूक दिली जात नसल्याचे कारण ऑस्ट्रेलियाने दिले आहे. यापूर्वी २०२३ मध्येही ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानशी खेळण्यास नकार दिला होता. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगमध्ये खेळण्यासाठी अफगाणिस्तानच्या खेळाडूंचे स्वागत केले जाते. रशीद म्हणाला,‘‘मला वाटते अफगाणिस्तानच्या प्रत्येकाने क्रिकेट खेळावे. कारण क्रिकेटनेच अफगाणिस्तानच्या जनतेला आनंद मिळवून दिला आहे. क्रिकेट हाच त्यांच्या आनंदाचा स्रोत आहे.’’

हेही वाचा >>> इंग्लंडचे फिरकी गोलंदाज डेरेक अंडरवूड यांचे निधन

‘‘ऑस्ट्रेलियाने खेळण्यास नकार दिल्याबद्दल मी कुणाशीही चर्चा केली नाही. हा विषय क्रिकेटचा किंवा क्रिकेटपटूंचा नाही. हा विषय दोन सरकारमधील आहे. खेळाडू म्हणून तुम्ही यात काही करू शकत नाही,’’ असेही रशीद म्हणाला. ‘‘गेल्या वर्षी पाठीवर शस्त्रक्रिया झाली. शस्त्रक्रियेनंतर झटपट लय मिळणे कठीण असते. भारताविरुद्ध खेळू शकलो नाही याची खंत वाटते. आता पुन्हा लय मिळाल्याने आनंद वाटत आहे,’’असेही रशीदने सांगितले. ‘‘यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये शमी नसल्याची उणीव जाणवत असली, तरी अन्य गोलंदाज मेहनत घेत आहे. आम्ही सकारात्मक सुरुवात केली आहे. प्रत्येकजण जबाबदारीने खेळत आहे. कधी कधी निकाल तुमच्या बाजूने लागत नाहीत. पण, कामगिरी चांगली होत आहे,’’ असे रशीद म्हणाला.

Story img Loader