सचिन तेंडुलकरच्या कारकिर्दीतील दोनशेवी आणि अखेरची कसोटी वानखेडे स्टेडियमवर जाऊन ‘..याचि डोळा’ पाहण्याचे मनसुबे बाळगणाऱ्या क्रिकेटरसिकांच्या पदरी सोमवारी घोर निराशा पडली. सकाळी वानखेडे स्टेडियमकडे तिकिट्स काढण्यासाठी क्रिकेटचाहत्यांनी प्रचंड गर्दी केली. याचप्रमाणे ऑनलाइन तिकीट विक्री करणारी ‘क्याझुंगा’ ही वेबसाइट कोलमडल्यामुळे गोंधळ उडाला. परंतु विलंबाच्या परिस्थितीनंतर काही चाहत्यांना ऑनलाइन तिकीट मिळवण्यात यश आल्याचे वृत्त आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) शनिवारीच तिकीट विक्री फक्त ऑनलाइनवर असेल, असे स्पष्ट केले होते. या प्रकारचे पत्रकही एमसीएने मुख्य प्रवेशद्वारापाशी लावले आहे. परंतु तिकीट खिडकीवर सचिनच्या सामन्याची तिकिटे मिळतील, या आशेने सकाळी वानखेडे स्टेडियमच्या प्रवेशद्वारापाशी रांग लागली होती. महाराष्ट्राच्या विविध भागांतून हे चाहते  तिकिटासाठी आले होते. अखेर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.
एमसीएने रविवारी सायंकाळी काढलेल्या पत्रकानुसार, पाचशे, एक हजार आणि अडीच हजार रुपये रकमेची सुमारे ३५०० तिकिट्स ऑनलाइन विक्रीसाठी क्याझुंगा या वेबसाइटवर उपलब्ध करण्यात येणार होती. मात्र सकाळी ११ वाजता  एकाच वेळी मोठय़ा संख्येने क्रिकेटरसिकांनी क्याझुंगा वेबसाइट गाठल्यामुळे ती ठप्प झाली. वेबसाइट दुरुस्तीचे कार्य युद्धपातळीवर केल्यानंतर सायंकाळच्या सुमारास काही जणांना तिकिटे मिळू शकली.
तिकिटे ३५००, इच्छुक दोन कोटी!

संस्थांना पुरवण्यात आली आहेत, तर उरलेल्या पाच हजार तिकिटांपैकी सचिन तेंडुलकर स्टॅण्डची दीड हजार तिकिटेही राखीव ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे सर्वसामान्य ‘सचिनप्रेमीं’च्या वाटय़ाला पाचशे, एक हजार आणि अडीच हजार रुपये रकमेची फक्त साडेतीन हजार तिकिटेच येणार आहेत.
सामन्याच्या तिकिटांची केवळ क्याझुंगा या वेबसाइटवरून ऑनलाइन विक्री केली जाईल, असे मुंबई क्रिकेट असोसिएशनने जाहीर केले होते. मात्र तरीही वानखेडेच्या तिकीट खिडकीवर क्रिकेट रसिकांनी सोमवारी भलीमोठी रांग लावली होती. महाराष्ट्रभरातून आलेल्या या चाहत्यांची गर्दी आवरता आवरेना झाल्याने पोलिसांना पाचारण करावे लागले. त्यामुळे संतप्त प्रेक्षकांनी एमसीए आणि शरद पवार यांच्या नावाने जोरदार घोषणाबाजी केली.
दुसरीकडे, क्याझुंगा संकेतस्थळावरून तिकिटे खरेदी करणाऱ्यांचीही इंटरनेटवर तोबा गर्दी उसळल्याने हे संकेतस्थळ सकाळी ११ वाजता सुरू होताच बंद पडले. वेबसाइट कोलमडल्यामुळे ‘सव्‍‌र्हर इज टू बिझी’ हा संदेश क्रिकेटरसिकांना पाहायला मिळाला. याचप्रमाणे काही क्रिकेटरसिकांना संगणकाची स्क्रीन रिकामीही पाहायला मिळाली. यासंदर्भात क्याझुंगाने सायंकाळी पत्रक काढले.
‘सचिनच्या अखेरच्या २००व्या सामन्याची उत्सुकता असल्यामुळे मोठय़ा संख्येने क्रिकेटरसिकांनी संकेतस्थळ गाठले. पहिल्या तासाभरात १ कोटी ९७ लाख लोकांनी संकेतस्थळाला भेट दिल्याने यंत्रणेवर ताण पडला. त्यामुळे ऑलिम्पिक क्रीडा स्पध्रेप्रमाणेच ऑनलाइन तिकिटांची परिस्थिती उद्भवली,’ असा खुलासा क्याझुंगाने केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा