माजी कर्णधार सौरव गांगुलीला विश्वास
‘‘सचिन काय प्रथमच त्रिफळाचीत झालेला नाही. तो आपल्या कारकीर्दीतील शिखरावर होता, तेव्हाही असे अनेकदा घडले होते. त्याने त्यावेळीसुद्धा त्यातून मार्ग काढला होता आणि आता तो पुन्हा मार्ग काढेल. मला नक्की ठाऊक आहे की, लोकांमध्ये जे बोलले जाते (त्याच्या निवृत्तीविषयी) त्यामुळे तो दुखावला असणार आणि तो नक्की त्याला प्रतिसाद देईल. सचिनसोबत बरीच वर्षे खेळतो आहे. त्यामुळे तो संपलेला नाही याची मला खात्री आहे,’’ असा विश्वास भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने बॉम्बे जिमखान्यावर शुक्रवारी झालेल्या चौथ्या दिलीप सरदेसाई स्मृती व्याख्यानमालेत व्यक्त केला.
न्यूझीलंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत सचिन तेंडुलकरचा तीनदा त्रिफळा उडाला. त्यामुळे त्याच्या निवृत्तीची चर्चा जोर धरू लागली होती. परंतु गांगुलीने सचिनची पाठराखण केली आहे. या कार्यक्रमाला अजित वाडेकर, दिलीप वेंगसरकर, संजय मांजरेकर आणि बापू नाडकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. तथापि क्रिकेट समालोचक हर्षां भोगलेने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
गांगुली पुढे म्हणाला की, सचिन एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० क्रिकेट आपला फॉर्म टिकविण्यासाठी खेळतो. हाच फॉर्म मग त्याला कसोटी क्रिकेटमध्ये उपयुक्त ठरतो. तो आता ३९-४० वर्षांचा आहे. त्याने सर्व प्रकारचे क्रिकेट खेळण्याची आवश्यकता नाही. मला असे वाटते की त्याने कसोटी क्रिकेटकडे अधिक लक्ष केंद्रित करावे.
ट्वेन्टी-२० हे क्रिकेटचे नवे व्याकरण आहे. गोलंदाजांचा इथे कस लागतो. पण गेल्या काही वर्षांतील बहुतांशी सामने आता निकाली होऊ लागले आहेत. कसोटीमधील शतकाचा वेग वाढला आहे. ट्वेन्टी-२० क्रिकेटमुळे एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेट अधिक वेगवान झाले आहे, असे गांगुली म्हणाला.
भारताचा कर्णधार होण्यापेक्षा आयपीएलचा संघनायक होणे, हे अधिक कठीण कार्य असते. मी भारताचा काही वष्रे कर्णधार असताना निवड समिती किंवा व्यवस्थापनाला कधीच उत्तरे द्यावी लागली नव्हती. पण आयपीएलच्या कर्णधाराला हॉटेलमध्ये पोहोचताच अनेक प्रश्नांना उत्तरे द्यावी लागतात, असा टोमणाही यावेळी गांगुलीने मारला.
भारतीय क्रिकेट फार वेगाने विकसित होते आहे. महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाराचा खेळ पाहिल्यावर भारताचे क्रिकेट हे सुरक्षित हातांमध्ये आहे. गेल्या एक-दीड वर्षांकडे पाहता भारताचे क्रिकेट उज्ज्वल आहे, याची साक्ष पटते. व्हीव्हीएस लक्ष्मण आणि राहुल द्रविड यांचे युग जरी संपले असले तरी धोनी आणि कोहलीसारखे खेळाडू भारताला पुढे नेतील. त्यांचा खेळण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असाच आहे, अशी ग्वाही गांगुलीने यावेळी दिली.
तो पुढे म्हणाला की, रणजी क्रिकेटमधून भारताला चांगले कसोटीपटू घडवता येतील, तर आयपीएलमधून एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२०साठी चांगले खेळाडू मिळतील. मी निवड समितीवर गेलो तर मी रणजीलाच अधिक महत्त्व देईन.
मी जेव्हा आर. अश्विन आणि प्रग्यान ओझा यांना पाहातो, तेव्हा त्यांना चांगले भविष्य आहे याची जाणीव होते. भारताकडे दर्जेदार फिरकी गोलंदाज आहेत. पण तीन फिरकी गोलंदाजांची निवड करायची झाल्यास हरभजनला स्थान द्यायला हवे, असे गांगुलीने सांगितले.
एक जुनी आठवण गांगुलीने सांगितली की, एमआरएफ अकादमीत वेगवान गोलंदाज होण्यासाठी मी आणि सचिन दोघेही डेनीस लिली यांच्याकडे गेलो होते. त्यांनी आम्हा दोघांकडे पाहिले आणि फलंदाज होणेच आमच्यासाठी योग्य असल्याचे सांगितले.

Story img Loader