बॉलीवूडमध्ये स्वत:च्या अभिनयाने वेगळा ठसा उमटवणारा अभिनेता इरफान खान याचे बुधवारी मुंबईत निधन झाले. कोलन इन्फेक्शनमुळे त्याला मंगळवारी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तो लवकर बरा होईल अशी साऱ्यांना अपेक्षा होती, पण बुधवारी सकाळी त्याची प्राणज्योत मालवली. तो ५४ वर्षांचा होता. कॅन्सरवर त्याने इच्छाशक्तीच्या जोरावर मात केली होती. त्यानंतर तो भारतातही परतला. पण बुधवारी त्याचे अकाली निधन झाले.

‘लाइफ इन अ मेट्रो’, ‘पानसिंग तोमर’, ‘द लंचबॉक्स’, ‘हैदर’, ‘गुंडे’, ‘पिकू’, ‘तलवार’, ‘हिंदी मीडियम’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या होत्या. सर्वप्रथम ‘पिकू’चे दिग्दर्शक शूजित सरकार यांनी ट्विटरद्वारे त्याला श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर क्रिकेट विश्वातूनही त्याला श्रद्धांजली वाहण्यात आली. सहजतेने अभिनय करणारा हरहुन्नरी अभिनेता हरपला अशा शब्दात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने त्याला आदरांजली वाहिली.

याशिवाय, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग, अनिल कुंबळे, गौतम गंभीर, मोहम्मद कैफ इत्यादि क्रिकेटपटूंनी त्याला ट्विटरद्वारे श्रद्धांजली वाहिली.

इरफान खानने मार्च २०१८ मध्ये कॅन्सर झाल्याचं जाहीर केलं होतं. यानंतर त्याने सर्व कामं थांबवली होती आणि उपचारासाठी लंडनला निघून गेला होता. २०१९ मध्ये परतल्यानंतर त्याने ‘अंग्रेजी मीडियम’ चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं होतं. चित्रपटातील अभिनयासाठी इरफान खानचं कौतुक करण्यात आलं होतं. सोबतच पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पदार्पण केल्याबद्दल आनंदही व्यक्त केला होता. १३ मार्च २०२० रोजी अंग्रेजी मीडियम चित्रपट रिलीज होणार होता. मात्र लॉकडाउनमुळे ६ एप्रिल रोजी डिजीटल प्लॅटफॉर्मवर चित्रपट रिलीज करण्यात आला. ‘अंग्रेजी मीडियम’ हा त्याचा शेवटचा चित्रपट ठरला.

जवळपास ३० वर्षांच्या करिअरमध्ये इरफानने ५० हून अधिक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं. बॉलिवूडसोबतच त्याने हॉलिवूडमध्येही छाप सोडली. कलाक्षेत्रातील अभूतपूर्व कामगिरीसाठी २०११ मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन त्याचा गौरव करण्यात आला होता.

Story img Loader