क्रिकेट हा आकड्यांचा खेळ आहे. खेळाडूंची मैदानातील विक्रमी आकडेवारी मैदान सोडल्यानंतरही चाहते विसरत नाहीत. सामना कोणत्याही संघाचा सुरु असो विक्रमी खेळीचा इतिहास पुन्हा पुन्हा ऐकायला मिळतो. अशाच आठवणीतील खेळीत पाकिस्तानचा स्फोटक फलंदाज आफ्रिदीच्या तुफानी शतकाचा समावेश आहे. सध्याच्या घडीला सर्वाधिक जलद शतक करण्याचा विक्रम हा दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सच्या नावे आहे. त्याने ३१ चेंडूत शतकी खेळी केली. मात्र त्यापूर्वी आफ्रिदीने पदार्पणाच्या सुरुवातीच्या काळात श्रीलंकेविरुद्ध ३७ चेंडूत धडाकेबाज शतक ठोकले होते. आफ्रिदीचा हा विक्रम जवळपास १८ वर्षे अबाधित होता. न्यूझीलंडच्या सीजे अँड्रसनने वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात ३६ चेंडूत शतकी खेळी करुन त्याचा विक्रम मोडीत काढला.

श्रीलंकेविरुद्ध नैरोबीच्या मैदानात आफ्रिदीने केलेली शतकी खेळी सचिनच्या बॅटने केली होती. खुद्द आफ्रिदीने यासंदर्भातील कबुली दिली होती. आफ्रिदी म्हणाला होता की, नैरोबीच्या नेट प्रॅक्टिसदरम्यान विकी भाई म्हणजेच वकार युनूसने मला एक बॅट दिली. तो म्हणाला या बॅटने खेळून पाहा. ही सचिनची बॅट आहे. मिळती जुळती बॅट सियालकोटमध्ये मिळते का पाहा, यासाठी सचिनने वकारला बॅट दिली होती. ही बॅट महान खेळाडूची असल्याचेही वकारने मला सांगितले. ती बॅट मला लकी ठरली, असे आफ्रिदी म्हणाला होता.

आफ्रिदीने पाकिस्तानकडून तब्बल ३९८ एकदिवसीय सामने खेळले आहेत. श्रीलंकेविरुद्ध केलेली वादळी खेळी त्याच्या कारकिर्दीतील अविस्मरणीय क्षण आहे. आफ्रिदीने या सामन्यात ४० चेंडूत १०२ धावा केल्या होत्या. यामध्ये ११ षटकांर आणि ४ चौकारांचा समावेश होता. या अविस्मरणीय खेळीशिवाय शाहिद आफ्रिदीच्या नावे एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकारांचा विक्रम आहे. त्याने एकूण ३५१ षटकार ठोकले आहेत.

Story img Loader