कदाचित मी केंद्रीय मंत्रीही होईन, मात्र क्रिकेट हे माझे पहिले प्रेम आहे आणि या खेळाचे माझ्यावरील असलेले ऋण मी कधीही विसरणार नाही, असे भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार व विद्यमान खासदार मोहम्मद अझरुद्दीन यांनी सांगितले. ट्वेन्टी-२० सामने खेळायला आवडेल का, यावर त्यांनी लगेचच हो म्हणून उत्तर दिले. ते म्हणाले, ‘‘या सामन्यांमध्ये एक-दोन षटकांमध्येच नाटय़ घडते. त्यामुळे चार-पाच षटके खेळण्याइतकी तंदुरुस्ती व चापल्य माझ्याकडे निश्चित आहे. आयपीएलमधील काही खेळाडूंची सुमार तंदुरुस्ती लक्षात घेता, त्यांच्या तुलनेत माझी तंदुरुस्ती खूपच उजवी आहे, असे मी आत्मविश्वासाने सांगेन. हे सामने निखळ मनोरंजनासाठी असले तरी युवा खेळाडूंना आपले नाणे खणखणीत करण्यासाठी उत्तम व्यासपीठ आहे.’’
ख्रिस गेल व डेव्हिड मिलर यांच्या धडाकेबाज शतकांबाबत अझर म्हणाले, ‘‘या दोघांनीही ज्या खेळपट्टय़ांवर आक्रमक शतके टोलविली, त्या पाटा होत्या आणि त्यावर गोलंदाज काहीही प्रभावी कामगिरी करू शकत नाहीत. अशा खेळपट्टय़ांवर मनसोक्त फलंदाजी करणे शक्य असते.’’
पुणे वॉरियर्सचा वेगवान गोलंदाज अशोक दिंडाबाबत अझर म्हणाले, ‘‘कागदावरती पुण्याचा संघ अतिशय समतोल किंबहुना बलाढय़ आहे. तुम्ही नियोजनपूर्वक खेळ केला पाहिजे. आरोन फिन्च व मिचेल मार्श यांना पहिल्या सामन्यापासून तुम्ही संधी द्यायला हवी होती. गोलंदाजांनी योग्य दिशा व टप्पा ओळखून गोलंदाजी केली पाहिजे.’’
‘‘चॅम्पियन्स स्पर्धेसाठी निवडण्यात आलेला भारतीय संघ अतिशय समतोल आहे. इंग्लंडमधील खेळपट्टय़ांवर धावा जमविणे हे एक आव्हानच असते, मात्र भारतीय फलंदाज चांगली कामगिरी करतील,’’ अशी खात्रीही अझर यांनी व्यक्त केली.
वयाचे अर्धशतक पार केलेल्या अझरुद्दीन यांना तंदुरुस्तीबाबत विचारले असता ते म्हणाले, ‘‘क्रिकेट खेळणे आता राजकीय व सामाजिक कार्यक्रमांमुळे जमत नाही. मात्र दररोज नियमित जिममध्ये व्यायाम करतो. दररोज विविध कार्यक्रमांकरिता खूप धावपळ होत असते. त्यामुळे सहसा सकाळीच व्यायाम करून मी बाहेर पडतो. संतुलित आहार घेतो.’’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा