भारत आणि पाकिस्तान म्हणजे परंपरागत प्रतिस्पर्धी. पण मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा एक असा खेळाडू आहे की जो देशांच्या सीमा, जात, पात, धर्म या साऱ्या वेशी ओलांडतो आणि तिथल्या लोकांच्या हृदयात जागा निर्माण करतो, पाकिस्तानची प्रसारमाध्यमेही त्याला अपवाद नाहीत. पाकिस्तानमधील इंग्रजी दैनिकांनी सचिनला अग्रलेखात स्थान दिले असून  ‘सचिनशिवाय क्रिकेट कमकुवत होईल’ असे त्यांचे म्हणणे आहे.
पाकिस्तानमधील उर्दू प्रसारमाध्यमांनी सचिनच्या निवृत्तीबद्दल जास्त काही लिहिले नसले तरी इंग्रजी वर्तमानपत्रांनी खेळभावना जपत सचिनला दैनिकात स्थान दिले आहे.
पाकिस्तानविरुद्ध १९८९ साली कराचीमध्ये पदार्पण केल्यानंतर सचिनने आपल्या दर्जेदार फलंदाजीच्या शैलीच्या जोरावर विश्वविक्रमांचे पुनर्लेखन केले. त्याची शंभर शतके आणि कसोटी क्रिकेटमधील १५ हजार धावांचा विश्वविक्रम बराच काळ अबाधित राहील. सचिन सध्या ४० वर्षांचा असून देशामध्ये त्याला देवत्व बहाल करण्यात आले आहे. यशामुळे कधीही त्याच्या डोक्यात हवा गेली नाही आणि याचे श्रेय त्याला द्यायलाच हवे. क्रिकेटच्या मैदानावर आणि बाहेरही तो वादविवादांपासून दूर राहिला, त्याची प्रतिमा नेहमीच निर्लेप राहिली, असे ‘डॉन’ या वृत्तपत्रात लिहिले आहे.
या वर्तमानपत्राने पुढे म्हटले आहे की, ‘‘राहुल द्रविड, वीरेंद्र सेहवाग, सौरव गांगुली, विराट कोहली आणि शिखर धवन यांच्यासारख्या गुणवान पिढीसाठीही तो आदर्शवत राहिला. गेले काही दिवस त्याच्याकडून लौकिकाला साजेशी कामगिरी होत नव्हती आणि त्यामुळेच त्याच्या निवृत्तीबाबत चर्चा सुरू होती. भारतीय संघात असताना त्याने नेहमीच सर्वोत्तम कामगिरी देण्याचा प्रयत्न केला.’’
‘दी एक्स्प्रेस ट्रायब्यून’ या वर्तमानपत्राने लिहिले आहे की, ‘जेव्हा भारतीय संघ अडचणीत असायचा किंवा जेव्हा मोठी धावसंख्या करायचा तेव्हा सचिनने अविस्मरणीय खेळी साकारल्या आहेत. पाकिस्तानविरुद्ध १९९९ साली चेन्नईमधील १३६ धावांची साहसी खेळी आणि २००३ च्या विश्वचषकातील ९८ धावांची खेळी विसरता येणार नाही. सचिनची फक्त भारतीयांनाच नाही तर अवघ्या क्रिकेटविश्वालाच उणीव भासेल.’’

Story img Loader