आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने क्रिकेट या खेळाचा ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत आज (१६ ऑक्टोबर) आयओसीची १४१ वी सत्र बैठक पार पडली. या बैठकीनंतर आयओसीने क्रिकेटच्या ऑलिम्पिकमधील समावेशाची घोषणा केली आहे. त्यामुळे २०२८ मध्ये लॉस एंजलिसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे टी-२० सामने खेळवले जातील. आयओसीच्या या निर्णयामुळे तब्बल १२८ वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचं पुनरागमन झालं आहे.
ऑलिम्पिक समितीने सांगितलं की क्रिकेट, सॉफ्टबॉल, स्क्वॉश, लॅक्रॉस आणि फ्लॅग फुटबॉल या पाच खेळांचा ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्यात आला आहे. बेसबॉल या स्थानिक खेळाचा ऑलिम्पिकच्या माध्यमातून प्रसार व्हावा, अशी संयोजक देशाची म्हणजेच अमेरिकेची विनंती ऑलिम्पिक समितीने मान्य केली आहे. स्क्वॉश हा तसा जागतिक खेळ आणि त्याच्या समावेशाविषयी अनेक वर्षे हालचाली सुरू होत्या. पण या सर्व खेळांमध्ये दर्शकव्याप्तीच्या बाबतीत क्रिकेट नि:संशय मोठा आहे. आयसीसीसह क्रिकेट खेळणाऱ्या अनेक देशांच्या प्रयत्नांनंतर आता ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश झाला आहे.
गेल्या वर्षी लॉस एंजलिस संयोजन समितीत क्रिकेटच्या ऑलिम्पिकमधील समावेशाविषयी चर्चा झाली होती. तसेच संयोजन समितीने त्यास अनुकूलता दर्शवली होती. क्रिकेट हा खेळ अद्याप अमेरिकेत म्हणावा तसा विकसित झालेला नाही. परंतु दक्षिण आशियाई स्थलांतरितांनी (यात अर्थातच प्राधान्याने भारतीय) हा खेळ त्या देशात लोकप्रिय केला आहे. यंदा पहिल्यांदाच त्या देशात आयपीएलसारखी फ्रँचायझीकेंद्री क्रिकेट स्पर्धा खेळवण्यात आली. शिवाय पुढील वर्षी होत असलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेचं सहयजमानपदही अमेरिकेला मिळालं आहे.
हे ही वाचा >> Danish Kaneria: “पाकिस्तान संघात धार्मिक भेदभाव नेहमीचाच” दानिश कनेरियाने जुना व्हिडीओ शेअर करत केला गंभीर आरोप
आयओसीचे अध्यक्ष थॉमस बाख हे गेल्या काही दिवसांपासून मुंबईत आहेत. गेल्या आठवड्यात बाख यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली होती. तेव्हा ते म्हणाले होते, “लवकरच ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट आणि इतर चार खेळांचा समावेश केला जाईल. आम्ही क्रिकेटची जगभरात वाढलेली लोकप्रियता पाहत आहोत. प्रामुख्याने क्रिकेटच्या टी-२० प्रकाराचे जगभरात चाहते आहेत.”